सलग दुसऱ्या दिवशीही कोरेगाव भीमात वाहतूककोंडी

शिक्रापूर  (वार्ताहर) – कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथे दीड महिन्यापासून रस्त्यावर पडलेल्या खड्डयांमुळे वाहनचालक, नागरिक वाहतूक कोंडीचा फटका सहन करीत आहेत. अनेक वाहनांचे मोठे नुकसान होत असून अनेकांना दुखापती झाल्या आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागावर पोलीस प्रशासन गुन्हे का दाखल करीत नाहीत, असा सवाल उपस्थित होत आहे.

कोरेगाव भीमा येथे पुणे- नगर महामार्गावर गेल्या दीड महिन्यापासुन रस्त्यावर पडलेला खड्डा बुजविण्यास बांधकाम विभागास अपयश आल्याने कोंडीला प्रवासी व वाहनचालकांना सामोरे जावे लागात आहे. बांधकाम विभाग खड्ड्यांमध्ये मुरुम, डस्ट, जेएसबी टाकून खड्डा तात्पुरता बुजविण्याचे काम करतात. परंतु पाऊस झाला की लगेच सर्व खड्डे पूर्ववत होत असल्याने प्रवास जिकीरीचे होत आहे. पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी बांधलेली गटारे उघडी असून पाणी वाहून जाण्यासाठी उतार नसल्याने गटारे असून नसल्यासारखी परिस्थिती झाली आहे.

पावसाचे पाणी रस्त्यावर येत असल्याने स्थानिक नागरिकांनी बांधकाम विभागाकडे सातत्याने तक्रारी केल्यानंतर 900 मीटर लांबीची पाइपलाइन करून पाणी नदी पात्रात सोडण्याचे काम सुरू केले. मात्र, नियोजनाचा अभाव असलेल्या कामात अनेक ठिकाणी पाईप वर आणि खाली अशा अवस्थेत टाकल्या आहेत. त्यामुळे त्या गटारांमधून पाणी पूर्णपणे जात नाही. या कामामुळे लाखो रुपये पाण्यातच गेल्याची परिस्थिती आहे.

पाच दिवस पावसाने उघडीप दिली असताना बांधकाम विभागाने रस्ता दुरुस्ती का केली नाही, असा सवाल नागरिक विचारत आहेत. पाण्याचा प्रवाह मोठा असल्याने ग्रामपंचायतीशेजारील सिमेंट कॉंक्रिट रस्ता खोदून नाली तयार करून पाणी काढण्यात आले. मात्र, हे पाणी रस्त्यावरून वाहून जात असल्याने दुर्गंधी पसरली आहे. पाण्याचा प्रवाह कमी होत नाही. तोपर्यंत कामही करता येत नसल्याने नागरिकांना दुर्गंधी सहन करावी लागणार आहे. अनेक ठिकाणी नागरिकांच्या घरात पाणी शिरले असल्यामुळे नागरिकांसह महिलांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

कोरेगाव भीमा येथे गेली महिनाभरापासून महामार्गावर पडलेल्या खड्डयांवर कायमस्वरुपी उपाययोजना न केल्याने पाऊस झाला की या मार्गावरून प्रवास करणाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. वाहतुक कोंडीचा रुग्णवाहिका, उद्योजक, शेतकरी, कामगारांना प्रवास नकोसा होत असल्याचे असे चित्र वाघोली ते शिक्रापूर टप्प्यात दिसत आहे. दरम्यान, चार दिवस पावसाने उघडीप दिली असतानाही सार्वजनिक बांधकाम विभागाला रस्ता दुरुस्तीचा मुहुर्त मिळणार कधी?
– लक्ष्मण गव्हाणे, जिल्हाध्यक्ष, माहिती सेवा समिती, पुणे
कोरेगाव भीमा येथील नैसर्गिक ओढे, नाल्यांचे नैसर्गिक स्त्रोत बुजविल्याने ही परिस्थिती ओढावली आहे. महसूल व पोलीस प्रशासनाच्या मदतीने येथील अतिक्रमण काढून ओढे, नाले खुले करण्यास सुरुवात केली आहे.
– मिलींद बारभाई, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)