संगमनेरात वाहतूककोंडीने नागरिकांचे हाल

अमोल मतकर
संगमनेर  – शहरातील वाहतूक कोंडीने सर्वसामान्य नागरिकांसह वाहनचालकांचे चांगलेच हाल होत आहेत. संगमनेर शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी स्वतंत्र वाहतूक शाखा कार्यान्वित करण्यात आली आहे. सुमारे 35 लाख रुपए खर्च करून उभारण्यात आलेली सिग्नल व्यवस्था सुरू होण्यापूर्वीच बंद पडली आहे. परिणामी शहरात अनेक ठिकाणी वाहतुकीची वारंवार कोंडी होत आहे. बसस्थानकाच्या मुख्य द्वारासमोरच अवैध प्रवासी वाहतूक करणारी वाहने उभी राहात असल्याने वाहतुकीला शिस्त लावणार कोण, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

संगमनेर शहरात नित्याने वाहतुकीची कोंडी होत आहे. तालुक्‍यातील ग्रामीण व शहरी भागांबरोबर अकोले, सिन्नर, कोपरगाव, राहाता, श्रीरामपूर, राहुरी, लोणी या परिसरातील नागरिक संगमनेरात नेहमीच खरेदीसाठी येत असतात. त्यामुळे शहरात वाहनांची नेहमीच वर्दळ असते. मात्र वाहतुकीला शिस्त नसल्यने कधी-कधी तीनबत्ती चौकापासून बसस्थानकापर्यंत छोट्या-मोठ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे प्रचंड हाल होतात. संगमनेरला स्वतंत्र वाहतूक शाखा कार्यान्वीत केली आहे. त्यासाठी स्वतंत्र पोलीस कर्मचारी नेमलेले आहेत. परंतु या शाखेकडे याबाबतचे कुठल्याच प्रकारचे नियोजन नसल्याने वाहतूक कोंडी होत असते.

नवीन नगररोड, बसस्थानक परिसर, तीनबत्ती चौक, मार्केट यार्ड या भागात वाहतूक कोंडी कायमच होत असते. मात्र वाहतूक शाखेचे अधिकारी व कर्मचारी ही वाहतूक कोंडी दूर करण्याऐवजी इतर मार्गांवर जाऊन मोठी वाहने अडवत त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात मग्न असतात. त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. रुग्णालये, बॅंका, पतसंस्था, खासगी व शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये, शिक्षण संस्था यासह विविध उद्योग, व्यवसाय संगमनेरात मोठ्या प्रमाणात असून, त्यांची संख्या वाढतच आहे. नव्याने झालेल्या संगमनेर बसस्थानकात वाहनतळ उभारण्यात आले.

परंतु तेथेही पुरेशी जागा उपलब्ध नसून, नियोजनाचाही अभाव आहे. बोटांवर मोजता येईल इतक्‍याच दुकानांना स्वत:ची पार्किंग आहे. त्यामुळे वाहनचालक वाहने लावण्यासाठी जागा शोधत असतात. फेरीवालेही वाहतुकीस अडथळा होईल अशाच पध्दतीने उभे असतात. शहरातील पुणे-नाशिक रस्त्यावर तसेच अकोले रस्त्यावर परवाना धारक खासगी जीप, रिक्षा प्रवासी मिळविण्यासाठी उभ्या असतात. त्यामुळे अनेकदा मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होत असते. त्याच्यावर वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांचा व कर्मचाऱ्यांचा कुठल्याच प्रकारचा वचक नसल्यामुळे वाहतूक शाखा असून नसल्यासारखीच आहे.

अवैध वाहतुकीचा सुळसुळाट
शहरात काळी-पिवळी, खासगी बस आणि खासगी कार मोठ्याप्रमाणावर प्रवासी वाहतूक करतात. त्याला कोणताही परवानगी नाही. मात्र याकडे वाहतूक पोलिसांसह उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे अधिकारीही अर्थपूर्ण’ डोळेझाक करीत असल्याने अपघाताची शक्‍यता वाढली आहे. ही अवैध वाहतूक तातडीने बंद होणे आवश्‍यक आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.