प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 18 -दहीहंडी उत्सवानिमित्त शुक्रवारी (दि. 19) शहरात होणारी गर्दी लक्षात घेऊन वाहतूक पोलिसांनी वाहतुकीत बदल केले आहेत. सायंकाळी पाचपासून प्रमुख रस्त्यांवरील वाहतूक बंद ठेवण्यात येणार असून, वाहनचालकांनी पर्यायी रस्त्यांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी केले आहे.
शहराच्या मध्यवर्ती भागातील बुधवार चौक ते दत्त मंदिर चौक, बेलबाग चौक ते सेवासदन चौक, बुधवार चौक ते अप्पा बळवंत चौक, मंडई चौक (बाबू गेणू चौक), साहित्य परिषद चौक, नवी पेठ इत्यादी ठिकाणी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. त्यामुळे येथील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. केवळ अत्यावश्यक सेवेतील वाहने (उदा. फायरब्रिगेड, पोलीस वाहने, रुग्णवाहिका इ.) वगळता सर्व वाहनांना रस्ता बंद असून, आवश्यकतेनुसार वाहतूक व्यवस्थेमध्ये बदल करण्यात येतील.
असा असेल वाहतूक बदल…
शिवाजी रस्त्यावरुन स्वारगेटला जाणारी वाहने स. गो. बर्वे चौकातून जंगली महाराज रस्त्याने खंडोजीबाबा चौक, टिळक चौक पुढे टिळक किंवा शास्त्री रस्त्याने इच्छितस्थळी जातील.
बाजीराव रस्त्यावरून शिवाजीनगरकडे जाणाऱ्या वाहनचालकांसाठी पूरम चौकातून टिळक रस्त्याने-अलका टॉकीज चौक व पुढे एफसी रस्त्याने इच्छित स्थळी जातील. तसेच पूरम चौकातून सेनादत्त चौकाकडे व पुढे इच्छितस्थळी जातील.
स. गो. बर्वे चौकातून पुणे मनपा भवनकडे शिवाजी रस्त्याने जाणारी वाहने स. गो. बर्वे चौकातून जंगली महाराज रस्त्याने झाशी राणी चौकात डावीकडे वळून इच्छितस्थळी जातील.
बुधवार चौकाकडून आप्पा बळवंत चौकाकडे एकेरी वाहतूक सोडण्यात येईल. आप्पा बळवंत चौकातून बुधवार चौकाकडे येणारी वाहतूक बाजीराव रस्त्याने सरळ पुढे इच्छितस्थळी जाईल.
रामेश्वर चौक ते शनिपार चौकाकडे येणारी वाहतूक बंद करण्यात येणार असून, पर्यायी मार्गाचा वापर करावा लागेल.
सोन्या मारुती चौकाकडून लक्ष्मी रस्त्याने सरळ सेवासदन चौकाकडे जाणारा रस्ता बंद ठेवण्यात येणार आहे. या रस्त्यावरील वाहने सोन्या मारुती चौकात उजवीकडे वळून फडके हौद चौकातून इच्छितस्थळी जातील.