पुणे – चांदणी चौकातील जुना पूल पाडल्यानंतर तेथे सेवा रस्त्याचे काम सुरू झाले आहे. आता येथील खडक नियंत्रित स्फोटांद्वारे फोडण्यात येणार असून, मंगळवारी (4 ऑक्टोबर) रात्री 11 ते मध्यरात्री 1.30 वाजेपर्यंत मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावरील सर्व प्रकारची वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. तर, यावर तोडगा म्हणून पर्यायी मार्गदेखील सुरू करण्यात आले आहेत.
याबाबतची माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी दिली. राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरण आणि वाहतूक पोलिसांनी पूर्वकल्पना न देता सोमवारी दुपारी चांदणी चौकातील खडक नियंत्रित स्फोटाद्वारे फोडला. यावेळी दोन्ही बाजुंची वाहतूक थांबविण्यात आली. त्यामुळे पुन्हा वाहतूक कोंडी झाली. नियोजनाअभावी विद्यार्थी, कामगार आणि प्रवाशांना तब्बल तीन ते चार तास वाहतूक कोंडी सहन करावी लागली. त्यामुळे आता मंगळवारी रात्री होणाऱ्या कामासाठी नियोजन करण्यात आले. पण, ही माहिती अगदी काही तास आधी जाहीर करण्यात आली. त्यामुळे पुन्हा वाहतूक कोंडीचे भूत मानगुटीवर आहे.
प्रवासासाठी पर्यायी मार्गांची माहिती
1) सातारा, पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांसाठी पर्यायी मार्ग : वडगाव पूल, वारजे पूल, आंबेडकर चौक, वनदेवी चौक, कर्वे पुतळा चौक, नळस्टॉप, विधी महाविद्यालय रस्ता, सेनापती बापट रस्ता, विद्यापीट चौक, राजीव गांधी पूल, ओैंध, वाकडमार्गे बाह्यवळण मार्गावर वाहनांनी जावे.
2) मुंबईहून साताऱ्याकडे जाणाऱ्या हलक्या आणि प्रवासी वाहनांसाठी : वाकड चौकातून डावीकडे वळून राजीव गांधी पुलावरुन विद्यापीठ चौक, संचेती चौक, खंडुजीबाबा चौक, टिळक रस्ता, जेधे चौक, स्वारगेट, पुणे-सातारा रस्ता, कात्रज चौक, कात्रज जुना घाट किंवा कात्रज चौकातून नवले पुलावरुन डावीकडेवळून मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर जावे. भूमकर चौकातून डावीकडे वळून डांगे चौक, रक्षक चौक, राजीव गांधी पुलावरुन, विद्यापीठ चौकातून, शिवाजीनगर मार्गे वाहनचालकांनी इच्छितस्थळी जावे.
3) किवळे चौकातून रावेत डांगे चौकमार्गे, रक्षक चौक, राजीव गांधी पूल, विद्यापीठ चौक, शिवाजीनगरमार्गे इच्छितस्थळी जावे. राधा चौकातून डावीकडे वळून बाणेर रस्त्याने विद्यापीठ चौक, शिवाजीनगरमार्गे इच्छितस्थळी जावे.