सातारा – नागेवाडी, ता सातारा येथील क्रशरवर रामसुंदर सिंह (वय 38, मूळ रा. रानाबिगाह, पाटणा, बिहार) या परप्रांतीय मजुराचा खून झाल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. खुनाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत मृताचा भाचा कन्हैयाचे नाव संशयित म्हणून निष्पन्न झाले आहे.
या प्रकरणी क्रशरचे व्यवस्थापक तानाजी शरद मोरे (वय 32) यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रामसुंदर सिंह हा नागेवाडी येथे विक्रम जाधव (रा. पाटण) यांच्या मालकीच्या क्रशरवर गेल्या काही महिन्यांपासून कामाला होता. त्याचा भाचा कन्हैया जवळच्याच क्रशरवर कामाला होता. सायंकाळी मात्र दोघेही एकाच ठिकाणी मुक्कामाला असत. क्रशरचे व्यवस्थापक मोरे हे सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजता काम संपवून घरी गेले.
सकाळी ते कामावर आले असता क्रशरवरील त्यांच्या कार्यालयापासून पन्नास फूट अंतरावर मोकळ्या जागेत रामसुंदर सिंह याचा खून झाल्याचे त्यांना दिसले. रामसुंदर याच्या डोक्याच्या मागील बाजूस गंभीर जखम होऊन मोठा रक्तस्राव झाल्याने त्याचा मृत्यू झाला होता. त्यावेळी रामसुंदरचा भाचा कन्हैया तेथे नव्हता.
मोरे यांनी या घटनेची माहिती सातारा तालुका पोलीस ठाण्यात दिली. त्यानंतर पोलीस निरीक्षक सजन हंकारे हे फौजफाट्यासह घटनास्थळी हजर झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह जिल्हा रुग्णालयाकडे पाठवला. कन्हैयाच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आल्याचे सांगण्यात आले.