लग्नसराईमुळे पारंपरिक वाजंत्र्यांना सुगीचे दिवस

डिजेमुळे व्यावसायाला लागली होती घरघर : पारंपरिक वाद्यांचा सूर पडतोय कानी

लोणी धामणी – नुकतीच दिवाळी संपली आणि तुळशीविवाह पार पडल्यानंतर लगेचच लग्नसराईची धामधूम सुरु झाली आहे. त्यामुळे पारंपारिक वाजंत्री ताफे या हंगामासाठी सज्ज झाले आहेत. डी.जेचा कर्कश आवाज व त्यावरील बंदीमुळे गेल्या चार-पाच वर्षात पारंपारिक वाजंत्री मंडळींना पुन्हा सुगीचे दिवस आले आहेत.

तुळशी विवाहनंतर यंदा लग्न तिथीला रविवारी (दि. 10) पहिल्या दिवशीच मोठ्या प्रमाणावर लग्नकार्ये पार पडली. लग्नसराईचा यंदाचा हंगाम धडाक्‍यात सुरू झाला आहे. लग्नसराई सुरू झाल्यामुळे पारंपारिक वाजंत्री मंडळी देखील विविध रुपात सज्ज झाली आहेत.

पोलिस प्रशासनाने डिजिटल साऊंड सिस्टिमवर निर्बंध घातल्यामुळे पारंपारिक वाजंत्री मंडळींना पुन्हा लग्नसराईच्या काळात मोठी मागणी वाढली आहे. त्यामुळे लग्न समारंभात पूर्वीप्रमाणे सनई, ताशा, संबळ, हलगी, डफ, तुतारी अशा पारंपारिक वाद्यांचा सूर कानी ऐकू येत आहे. गेल्या चार-पाच वर्षात पारंपारिक वाजंत्री मंडळींना पुन्हा एकदा सुगीचे दिवस आले आहेत. बैलगाडा शर्यत बंदीमुळे गेली काही वर्षे या व्यवसायला मोठ्या प्रमाणावर फटका बसला होता.

मोठ्या प्रमाणात मागणी वाढली

सध्या या मंडळींना वर्षभरात केवळ लग्नसराईचा हंगाम मिळतो. यामध्येच ते कमाई करतात.अलीकडच्या काळात वाजंत्री कलाकारांना चांगले पैसे मिळत आहेत. एका दिवसाची लग्नाची सुपारी जवळपास 18 ते 20 हजार रुपयांपर्यंत ते घेतात. एका ताफ्यात सहा ते सात वाजंत्री कलाकार असतात. त्यांना चांगली मागणी वाढल्याने वाजंत्री मंडळींनी देखील अनेक बदल केले आहेत..त्यामुळे लग्न समारंभात देखील वाजंत्री मंडळींचं आकर्षण ठरत आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.