भुसार बाजारातील उलाढाल कमीच

ऐन दिवाळीत मार्केट यार्डात तुरळक गर्दी


ग्राहकांनी पाठ फिरविल्याचा परिणाम


नेहमीच्या तुलनेत 60 ते 70 टक्‍केच व्यापार

– विजयकुमार कुलकर्णी

पुणे – तयार फराळ पदार्थ खरेदीकडे नोकरदार वर्गाचा वाढलेला कल…किराणा माल पारंपरिकऐवजी मॉलमधून खरेदीचा ट्रेंड…ग्रामीण भागातून येणाऱ्या खरेदीदारांची कमी झालेली संख्या, या सर्वांचा परिणाम म्हणून पश्‍चिम महाराष्ट्रातील सर्वांत मोठी घाऊक बाजारपेठ असलेल्या मार्केट यार्डातील भुसार विभागातील उलाढाल घटली आहे. नेहमीच्या तुलनेत साठ ते सत्तर टक्केच उलाढाल असून, नोटबंदी, जीसटीनंतर (वस्तू-सेवा कर) बाजार अजून पूर्वीप्रमाणे सुरळीत सुरू झाला नसल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.

मार्केट यार्डातील भुसार बाजारात किराणा माल घाऊक भावात मिळत असल्याने पूर्वी शहर, उपनगर, ग्रामीण आणि अहमदनगर जिल्ह्यातील काही भागातून खरेदीदार पूर्वी मोठ्या संख्येने यायचे. ग्रामीण भागातील, शहरातील सर्व किराणा दुकानदार त्यांचा माल ठोक स्वरूपात येथून भरत. याबरोबरच येथे किरकोळ विक्रीही घाऊक भावात केली जात होती. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकही दिवाळी अथवा दर महिन्याच्या किराणा येथूनच भरण्यास प्राधान्य देत होते. मात्र, मागील काही वर्षात शहरात, उपनगर आणि तालुक्‍याच्या ठिकाणीही मोठ-मोठे मॉल उभे राहिले आहेत. येथे घाऊक भावानेच किराणा माल नागरिकांना घराजवळ उपलब्ध होत आहे.

उच्च न्यायालयानेही दिलेल्या आदेशानुसार येथील किरकोळ विक्री बंद झाली होती. ती सुरू झाली असली, तरीही ग्राहकांना याबाबत पुरेशी माहिती नाही. त्यामुळे येथे किरकोळ खरेदीसाठी येणाऱ्यांची संख्या घटली आहे. या सर्व बाबींचा परिणाम मार्केट यार्डातील ग्राहक कमी होण्यावर झाला आहे. भुसार बाजारातील सर्व वस्तुंचे भाव गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी झाले आहेत. तरीही येथील उलाढाल तीस ते चाळीस टक्‍क्‍यांनी कमी झाली आहे. त्यामुळे व्यापारी चिंतेत आहेत.

नोटाबंदी, जीएसटीच्या परिणामातून अद्याप भुसार बाजार बाहेर आलेला नाही. त्यातच शहर, उपनगर आणि ग्रामीण भागातूनही मार्केट यार्डात खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांची संख्या कमी झाली आहे. परिणामी ऐन दिवाळीत बाजारपेठेतील उलाढाल नेहमीच्या तुलनेत घटली आहे. येथील व्यापार काही प्रमाणात कमी झाला आहे.
– पोपटलाल ओस्तवाल, अध्यक्ष, दी पुना मर्चंट चेंबर.

Leave A Reply

Your email address will not be published.