पुणे (प्रतिनिधी) – राज्य सरकार, महापालिका प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून ज्या व्यापाऱ्यांना शक्य आहे. त्या व्यापाऱ्यांनी दुकाने सुरू करावीत, असा निर्णय पुणे व्यापारी महासंघाने घेतला असल्याची माहिती अध्यक्ष फत्तेचंद रांका आणि सचिव महेंद्र पितळीया यांनी दिली. दुकाने सुरू करताना मास्क, सॅनिटायझर, हातमोजे आणि सोशल डिस्टनिंगचे पालन करावे, असेही यावेळी सांगण्यात आले आहे.
शहरातील 30 हजार दुकाने आणि व्यापाऱयांच्या 82 संघटना महासंघाशी संलग्न आहेत. या निर्णयामुळे पुण्याची बाजारपेठ सुरू होणार आहे. सुमारे दोन महिन्यांपासून दुकाने बंद आहेत. व्यापाऱ्यांना कामगारांचे पगार द्यावे लागतात. वीज बिल, इतर खर्च आहेत. तज्ञांच्या मते पुढील आणखी काही काळ करोना संसर्ग राहण्याची शक्यता आहे. यापुढे व्यापार बंद ठेवल्यास व्यापाऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सरकार काही गाईडलाईन जाहीर करणार आहे. त्या गाईडलाईनचे पालन करून दुकाने सुरु ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.