वाठार स्टेशन, {जलालखान पठाण} – यंदा उत्तर कोरेगावच्या परिसरात अवेळी पडलेला पाऊस व अतिवृष्टीमुळे घटलेले उत्पादन, पडलेला दर, भिजलेला घेवडा खरेदी करण्यासाठी परिसरातील व्यापारी कानाडोळा करीत असल्याचे दिसून येत आहे.अशा अनेक कारणांमुळे घेवडा उत्पादक शेतकऱ्यांवर आर्थिक संकट उद्भवले आहे.
कोरेगाव तालुक्याचा उत्तर भाग हा घेवड्याचे आगार म्हणून ओळखले जाते. या पिकाला साधारण कोरडे हवामान मानवते. अतिपाऊस व जास्त तापमान सहन होत नाही. उत्तर कोरेगावात घेवड्याला जमीन आणि हवामान पोषक असल्याने अनेक शेतकरी त्याचे उत्पादन घेतात.
जाधववाडी, विखळे, तळीये, बिचुकले, नलवडेवाडी, पिंपोडे बुद्रुक, वाठार स्टेशन आदी भागात मे-जूनमध्ये घेवड्याची पेरणी होते.
लागवडीनंतर सुमारे दोन महिन्यांनी उत्पादन सुरू होते. ओल्या शेंगांचे सुमारे पाच ते सहा तोडे होतात. एकूण एकरी ३५ ते ४० क्विंटल उत्पादन मिळते. मात्र अवेळी पडलेल्या पावसामुळे घेवडा पिकाचे उत्पन्न घटलेले आहे.
परिसरातील वाठार स्टेशन, पिंपोडे बुद्रुक, सोनके, नांदवळ, करंजखोप, वाघोली परिसरात खरीप हंगामात घेवडा पिकाचे उच्चांकी उत्पादन घेतले जाते.
घेवडा पिकातून मिळणाऱ्या आर्थिक मिळकतीवरच परिसरातील शेतकऱ्याची दिवाळी अवलंबून असते.मात्र यावर्षी अवेळी पडलेल्या पावसाच्या लहरीपणामुळे घेवड्याचे उत्पादन घटले आहे.
पावसात भिजलेला घेवडा लाल पडला
याशिवाय काढणी व मळणी काळात पावसाचा दीर्घकाळीन मुक्काम राहिल्याने घेवड्याचे अतोनात नुकसान झाले असून, पावसात भिजलेला घेवडा लाल पडला असल्यामुळे परिसरातील व्यापाऱ्यांनी घेवडा खरेदीबाबत कानाडोळा केला आहे.
याउलट काही ठिकाणी घेवड्याची खरेदी केली जात असली तरी ती अत्यंत नीचांकी दराने होत आहे. त्यामुळे घेवडा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या सर्व कारणामुळे यंदा बळीराजाची दिवाळी गोड होणार का ? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.