मार्केट यार्डात ग्राहकांची गर्दी वाढू लागली; व्यवहार येत आहेत रुळावर
– हर्षद कटारिया
बिबवेवाडी – शहरातील करोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी होत असताना ग्राहकही आता दैनंदिन कामाकाजासाठी बाहेर पडू लागले आहेत. यामुळे सहा ते सात महिन्यांच्या दीर्घ काळानंतर बाजारपेठांमध्ये पूर्वीसारखी ग्राहकांची वर्दळ वाढू लागली आहे. दसरा-दिवाळी सणोत्सवाच्या मुहुर्तावर मार्केट यार्डातील भुसार बाजारातील व्यापाऱ्यांत उलाढाल वाढीचा उत्साह आहे.
लॉकडाऊननंतर करोनाचा प्रादूर्भाव काहीसा कमी होत असल्याचा दिलासा आरोग्य यंत्रणेने दिल्यानंतर दसरा आणि दिवाळी या मोठ्या सणांत भुसार बाजारातील उलाढाल वाढेल, अशी आशा व्यापऱ्यांतून व्यक्त केली जाऊ लागली आहे. या काळात पगार तसेच बोनसमधून आर्थिक चणचण काहीशी कमी होणार असल्याने त्यातून जीवनाश्यक वस्तू म्हणून भुसार माल खरेदीकडे ग्राहकांचा कल अधिक असणार आहे.
लॉकडाऊनच्या कालावधीत दोन, तीन महिन्यांचा माल एकदम भरून ठेवणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या ग्राहकांचीही वर्दळ बाजारात दिसू लागली आहे. यातूनच ग्राहकांची आर्थिक चणचण लक्षात घेता. सणोत्सवाच्या काळात विविध कंपन्यांनी आपल्या मालावर आकर्षक बक्षिसं जाहीर केली आहेत.
करोनाच्या कालावधीत ग्राहकांच्या जीवनशैलीत कमालीचा फरक झाला आहे. ही बाब लक्षात घेऊन कन्झ्युमर प्रॉडक्टस्वर अनेक ऑफर बाजारात आल्या आहेत. या गोष्टीचा परिणाम म्हणून बाजारपेठेतील उलाढाल वाढू लागली आहे.
घरपोच सेवा ठरली उपयुक्त…
दुकानदारांनी अनेक सोसायट्यांत तसेच कॉलनींत भुसार माल देण्याची सुविधा करोना काळातही कायम ठेवली होती. अनेकांनी व्हॉटस्ऍपवर ग्रुप तयार करून त्याद्वारे वेळेत सेवा दिली. यामुळे भुसार विभागात उलाढाल होत होती. यातून ऐन लॉकडाऊनच्या काळात शेकडो जणांना यातून रोजगारही मिळाला होता. आता, ग्राहक बाहेर पडू लागला असला तरी घरपोच सेवेला अद्यापही मागणी आहे.
खाण्यापिण्याच्या वस्तुंबरोबरच गृहोपयोगी वस्तूंना मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी अधिक मागणी आहे. मागच्या वर्षी मर्यादित धान्यसाठा होता, त्या तुलनेत या वर्षी ग्राहकांमध्ये भाजके पोहे, नमकीन पदार्थ बनवण्यासाठी लागणारे साहित्य, रवा, मैदा, पीठ यांचा खप अधिक वाढला आहे.
– राजेंद्र बाठिया, व्यापारी, मार्केट यार्ड
प्रशासनाने आता दुकानांची वेळ वाढवून दिली आहे. यामुळे खरेदीसाठी नोकरदार वर्गाला स्थानिक दुकानांतून खरेदी करणे सोयीचे झाले आहे. त्यातच जागृकता वाढल्याने ग्राहक मास्कघालून खरेदीसाठी बाहेर पडत आहे. यातून उलाढाल वाढू लागली आहे.
– प्रवीण चोरबेले, व्यापारी, मार्कट यार्ड
ग्राहक बाहेर पडत असल्याने याचा परिणाम दिसू लागला आहे. ग्राहकांनी दिवाळीनिमित्त खरेदी करताना स्थानिक दुकानातून व स्वदेशी वस्तू घेण्यावर भर द्यावा. ऑनलाइन खरेदीमुळे ग्राहक आळशी बनतो. स्थानिक दुकानांतू जेवढी उलाढाल वाढेल तेवढी बाजाराला चालना मिळेल.
– अभय संचेती , व्यापारी, मार्केट यार्ड
मार्केट यार्ड भुसार बाजारात खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होऊ लागली आहे. स्थानिक ठिकाणच्या दुकानांतून खरेदी वाढल्याने मार्केट यार्डातही उलाढाल होत आहे. ग्राहक आता ऑनलाइन खरेदी टाळत असून स्थानिक दुकानदारांकडून खरेदी करू लागले आहेत. दुकानदाराने सुद्धा ग्राहकांच्या फायद्याचा व पसंतीच्या वस्तू विक्रीस ठेवण्यावर भर दिला आहे.
– जसराज चौधरी, व्यापारी, मार्केट यार्ड
सणासुदीला नागरिकांनी लागणाऱ्या बाबी स्थानिक व्यापाऱ्यांकडूनच खरेदी कराव्यात. त्यामुळेच बाजाराला खरी आर्थिक चालना मिळू शकेल. खरेदी करताना सर्वांनी आरोग्याची काळजी घ्यावी. खरेदीसाठी बाहेर पडताना करोना रोखण्याची जबाबदारी देखील आपलीच आहे.
– वालचंद संचेती, व्यापारी, मार्केट यार्ड