व्यापार, उद्योगाचे “पुरंदर’ महाद्वार होणार

कोथळे येथे राज्यमंत्री विजय शिवतारे यांचे प्रतिपादन

जेजुरी- पुरंदर तालुक्‍यात होणारे विमानतळ, गुंजवणी धरणाचे पाणी आणि दिवे येथे होणारा राष्ट्रीय बाजार यामुळे तालुक्‍यात विकासाचे महाद्वार निर्माण होऊन व्यापार, रोजगार आणि उद्योगाचे ठिकाण म्हणून जगाच्या नकाशावर पुरंदर तालुक्‍याचे महत्त्व वाढणार आहे, असे जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी सांगितले

कोथळे (ता. पुरंदर) येथील श्री मल्हार शिक्षण मंडळाच्या विद्या महामंडळ प्रशालेतील कार्यक्रमात राज्यमंत्री शिवतारे बोलत होते. ते म्हणाले की, पुरंदर मध्ये होणाऱ्या विमानतळाला विरोध केला जात आहे. परंतु, हे विमानतळ झाल्यानंतर शेतकऱ्यांचे गैरसमज दूर होतील. शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच याचे काम होणार असून त्यांना मुबलक फायदा होणार आहे. विमानतळाच्या परिसरात होणारी एमआयडीसी, मॉल, व्यापार, व्यवसाय आदींची भरभराट होणार आहे. 28 वर्षे रखडलेले गुंजवणीचे काम पूर्ण झाले आहे.

दिवे येथे राष्ट्रीय बाजाराला मान्यता मिळाली असून अडीचशे एकरात साडेचार हजार गाळे काढले जाणार आहेत. स्थानिक तरुणांना येथे रोजगाराची संघी दिली जाणार आहे. शेतकऱ्यांचा शेतीमाल आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत जाणार असल्याने शेतीमालाला योग्य भाव मिळणार आहे, असेही शिवतारे यांनी सांगितले.

यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य दिलीप यादव, नियोजन मंडळाचे सदस्य प्रकाश भोईटे, सभापती रमेश जाधव, शिवसेनेचे उमेश गायकवाड, श्री मल्हार शिक्षण मंडळाचे पदाधिकारी ज्ञानेश्वर भोईटे गुरुजी, राजेंद्र जगताप, विलास जगताप, उपसरपंच वंदना जगताप, तुषार खैरे, पांडुरंग जगताप, किशोर जगताप, सागर भोसले, गोरख जगताप, आकाश शिळीमकर, अक्षय जगताप, गणेश जगताप, मुख्याध्यापक एच.डी.दरेकर, गोविंद लाखे आदी उपस्थित होते सूत्रसंचालन नितीन राऊत यांनी तर मुख्याध्यापक एच. डी. दरेकर यांनी आभार मानले.

 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here