हेमंत देसाई
करोना विषाणूच्या संसर्गामुळे घायाळ झालेली अर्थव्यवस्था लवकरच पुन्हा उसळी घेताना दिसेल आणि तसे संकेतही मिळाले आहेत, असे उद्गार नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी काढले आहेत. त्यांच्या या उद्गारांमुळे निराश झालेल्यांना नक्कीच दिलासा मिळेल.
अर्थव्यवस्थेच्या अनेक क्षेत्रांत हिरवे कोंब फुटताना दिसत आहेत आणि ग्राहकोपयोगी उत्पादनांसारख्या क्षेत्राने उभारीही दाखवली आहे, हे खरेच आहे. संकटातून संधी निर्माण होतात, असे म्हटले जाते. करोनामुळे हॉटेल, पर्यटन, मालवाहतूक, कुरियर इत्यादी उद्योगांवर विपरीत परिणाम झाला आहे; परंतु त्याचवेळी डेटा, आर्टिफिशियल इंटलिजन्स, जेनॉमिक्स, मोबिलिटी असा एकूण बारा-तेरा उद्योगक्षेत्रांना उत्तम भवितव्य असल्याचे सांगण्यात येते.
इन्फोसिसचे एक संस्थापक नंदन नीलकेणी यांनीही गेल्या आठवड्यात एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत, माहिती तंत्रज्ञान आणि एकूणच डिजिटल तंत्रज्ञानाधारित उद्योगांना प्रचंड संधी निर्माण झाल्या असल्याची माहिती दिली. केंद्र सरकारने याची दखल घेऊन त्वरेने कृतियोजना आखली पाहिजे.
सुदैवाने देशभर सर्वत्र दमदार पाऊस झाला असून, शेअरबाजारात त्याची चांगली प्रतिक्रिया उमटलेली आहे.
मार्च 2020 अखेर संपलेल्या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत भारतीय कंपन्यांची नफा क्षमता घटूनही, कंपन्यांनी त्यांच्या लाभांश वाटपात वाढ केली आहे. कंपन्यांच्या प्रस्तावित लाभांश वाटपाच्या रकमेत साडेसहा टक्क्यांची वाढ झाली असून, मागील तीन वर्षांतील ही सर्वात जास्त वाढ आहे. बजाज ऑटो, नेस्ले, हिंदुस्तान युनिलिव्हर, आयटीसी, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस यासारख्या, व्यवसायातून भरपूर रोख नफा कमावणाऱ्या कंपन्यांनी भागधारकांना देऊ केलेल्या लाभांशाचा टक्का वाढवून, एकूण वृद्धीदरास चांगलाच हातभार लावला आहे.
टाळेबंदी असूनही एप्रिल आणि मे 2020 मधील भारताचा परदेश व्यापार शिलकीचा आहे. वरवर पाहता, ही अत्यंत स्वागतार्ह व आनंदाची बाब वाटत असली तरी आयात घटल्यामुळे हे घडून आले आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. याचे कारण, लाखो व्यवसाय-उद्योग काही महिने बंद राहिल्यामुळे त्यांना कच्चा माल, सुटे भाग आणि यंत्रसामग्री आणण्याची गरजच भासली नाही.
2019-20च्या जानेवारी ते मार्चमधील, म्हणजे चौथ्या तिमाहीतील आकडेवारी भारतीय रिझर्व्ह बॅंकेने प्रसिद्ध केली आहे. या काळात भारताने सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या 0.1 टक्के इतकी चालू खात्यावरील शिल्लक दाखवली आहे. अल्प व्यापारी तूट असल्यामुळे हे घडून आले. हा कल त्यानंतरही तसाच राहिला असून, केंद्रीय वाणिज्य खात्याने एप्रिल व मे 2020 मधील जी आकडेवारी प्रसृत केली आहे, त्यावरून हे स्पष्ट होते. अनेक महिन्यांनंतर भारताचा आयात-निर्यात व्यापार शिलकीचा झाला आहे.
1976-77 नंतर भारताची “मर्चंडाइज’ व्यापारी तूट ही कायमच राहिली आहे. वर्षोनुवर्षे उच्च व्यापारी तूट असणे, हीदेखील सरकार व रिझर्व्ह बॅंकेच्यादृष्टीने काळजीचीच बाब असते. सुदैवाने सेवांची निर्यात आणि परदेशात स्थायिक झालेल्या भारतीयांकडून येणारा पैसा यामुळे भारताची व्यापारी तूट हळूहळू घटली आणि आता ही तूट संपली आहे. परंतु आपल्याला नेहमीच तूट का बघावी लागते? याचे कारण आपण घसघशीत निर्यात करू शकत नाही आणि आयातही कमीच करतो.
सिंगापूर, मलेशिया, इंडोनेशिया, दक्षिण कोरिया, व्हिएतनाम, हॉंगकॉंग यांच्या तुलनेत आपली निर्यात अत्यल्प आहे. या घडीला भारतातील राष्ट्रवादींना रुचत नसले, तरी चीनची निर्यात आपल्यापेक्षा काही पटींनी जास्त आहे, हे वास्तव आहे. त्यामुळे चीनला दणका देण्यासाठी अनेक देशवासीयांचे हात सुळसुळत असले, तरी त्यासाठी प्रथम भारताची निर्यातक्षमता वाढवावी लागेल. शिवाय कच्चे तेल, सोने आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू यांची आपण तुफान आयात करत असतो.
कोविड पेचप्रसंगामुळे जागतिक व्यापार घटल्याचे डब्ल्यूटीओची ताजी आकडेवारी दर्शवते. 2020 सालच्या दुसऱ्या तिमाहीत जागतिक व्यापार 18 टक्क्यांनी घटला आहे. ही घट जागतिक व्यापाराच्या इतिहासातील विक्रमी म्हणावी लागेल. जानेवारी आणि फेब्रुवारी 2020 मध्ये भारताचा मर्चंडाइज व्यापार (निर्यात अधिक आयात) 66 अब्ज डॉलर्स इतका होता. तो एप्रिल महिन्यात 28 अब्ज डॉलर्सवर घसरला आणि मे महिन्यात पुन्हा 41 अब्ज डॉलर्सवर जाऊन पोहोचला.
मे 2019 मध्ये भारताचा मर्चंडाइज व्यापार 75 अब्ज डॉलर्स इतका होता. त्या तुलनेत 2020 मध्ये झालेली घट 45 टक्क्यांची आहे. केवळ मर्चंडाइज आयातीचा विचार केला, तर त्यात 51 टक्क्यांची घट झाली आहे. सुदैवाने भारताचा सरासरी सेवाव्यापार जानेवारी व फेब्रुवारीत 33 अब्ज डॉलर्स इतका होता. तो मागच्या वर्षात सरासरी 26 अब्ज डॉलर्स इतका होता. गेल्या वर्षाच्या एप्रिल व मे महिन्यांशी तुलना केली, तर एकूण सेवानिर्यात 13 टक्क्यांनी घटली आहे, तर सेवा आयात 26 टक्क्यांनी. तरीदेखील ट्रॅव्हल, टुरिझम, हॉस्पिटॅलिटी, एअरलाइन्स ही क्षेत्रे जवळपास बंदच असताना, त्यांच्या व्यापारात तशी प्रचंड घट झालेली नाही.
बारकाईने पाहिले, तर सोने (-98 टक्के), पेट्रोलियम वस्तू (-72 टक्के), कोळसा (-45 टक्के), इलेक्ट्रॉनिक्स (-40 टक्के) आणि यंत्रसामग्री (-34 टक्के) या प्रमाणात आयात घटली आहे. 2020 मध्ये भारताचा जीडीपी साडेचार टक्क्यांनी आक्रसेल, असा होरा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुकमध्ये नोंदवण्यात आला आहे. स्वतंत्र भारतातील ही दुसरी विक्रमी घसरण असेल. ही चिंतेची बाब असून, म्हणूनच ठोस पावले उचलण्याची गरज आहे.