नवी दिल्ली – कृषी विधेयकांच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाचा भाग म्हणून युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आज इंडिया गेटवर एक ट्रॅक्टर पेटवून दिला. या प्रकरणी पंजाब युवक कॉंग्रेसच्या पाच कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पंजाब युवक कॉंग्रेसचे सुमारे 15-20 कार्यकर्ते एका ट्रकमधून ट्रॅक्टर घेऊन मान सिंग क्रॉसिंगवर राजपथावर आले होते. त्यांनी ट्रकमधून हा ट्रॅक्टर खाली उतरवला आणि पेटवून दिला. सकाळी 7 वाजून 42 मिनिटांनी या घटनेबाबत अग्निशामक दलाला सूचना मिळाली आणि अग्निशामक दलाचे दोन बंब घटनास्थळी रवाना झाले. आग विझवण्यात आल्यानंतर हा ट्रॅक्टर तेथून हटवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
शहिद भगत सिंग यांच्या जयंतीच्या निमित्ताने पंजाब युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी इंडिया गेटवर कृषी विधेयकावर आंदोलन केल्याचे संघटनेच्या प्रचार प्रमुखांनी सांगितले. शेतकरी म्हणजे आपल्या देशाचा कणा आहे. मात्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांचा निषेध करण्यासाठी भगत सिंग यांच्या जयंतीदिनी टॅक्टर पेटवून दिल्याचे त्यांनी सांगितले.
मात्र हे आंदोलन अफवा पसरवून हिंसाचार घडवून आणण्यासाठी केले जात असल्याची तक्रार आपण दाखल करणार असल्याचे भाजपचे प्रचार प्रमुख नीलकांत बक्षी यांनी सांगितले.
हे आंदोलन करणाऱ्या 5 जणांना ताब्यात घेतले गेले आहे आणि एक इनोव्हा कारही ताब्यात घेतली गेली आहे, असे पूर्व दिल्लीचे पोलीस उपायुक्त ईश सिंघल यांनी सांगितले.