नवी दिल्ली – टोयोटा किर्लोस्कर मोटार कंपनीने आपल्या हीलक्स या नव्या वाहनाची बुकिंग थांबविली आहे. ग्राहकाकडून या वाहनाला जास्त प्रतिसाद मिळत आहे. मात्र सुटे भाग उपलब्ध नसल्यामुळे मागणी इतके उत्पादन करणे शक्य नसल्यामुळे ही बुकिंग कंपनीने थांविली आहे. एप्रील महिन्यात हे वाहन उपलब्ध होणार असल्याची घोषणा केली होती. मात्र आता बुकिंग थांबविण्यात आले असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
कंपनीने आणखी किंमत जाहीर केलेली नसतानाही कंपनीला बुकिंग थांबवावी लागली आहे. भारतातील वाहन उत्पादन कंपन्यांसमोर गेल्या एक वर्षापासून सेमीकंडक्टर आणि इतर सुट्या भागाच्या तुटवड्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यामुळे बहुतांश कार कंपन्यांची विविध मॉडेल ग्राहकांना उपलब्ध होत नाहीत.
त्यामुळे गेल्या काही महिन्यापासून वाहनाच्या विक्रीवर परिणाम झालेला आहे. मागणी असूनही कंपन्या उत्पादन पुरवू शकत नाहीत अशी विचित्र परिस्थिती वाहन उद्योगासमोर निर्माण झालेली आहे. लॉक डाऊनमुळे जागतिक पुरवठयावर परिणाम झाला होता.
त्याचबरोबर इतर क्षेत्राकडून सेमीकंडक्टरची मागणी वाढल्यामुळे वाहन उद्योगाला पुरेसे सेमीकंडक्टर उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे इतर इलेक्ट्रॉनिक उत्पादनाचाही तुटवडा विविध कंपन्यांना जाणवत आहे. यातून मार्ग काढण्यासाठी भारताने सेमीकंडक्टर क्षेत्रांमध्ये आत्मनिर्भर भारत हे धोरण जाहीर केले असून यासाठी उत्पादन आधारित अनुदान योजना लागू केली आहे.