जम्मू – पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेच्या एका खतरनाक सदस्याला जम्मू-काश्मीरमध्ये अटक करण्यात आली. जमालउद्दीन गुज्जर उर्फ अबू बाकर असे त्याचे नाव आहे. सुरक्षा दलांनी त्याला दोडा जिल्ह्यातील जंगलात पकडले. त्याच्याकडील एके-47 रायफल जप्त करण्यात आली. मागील वर्षी त्याचे रायफलसमवेत एक छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. याआधी एका चकमकीत तो जखमी झाला होता.
मात्र, त्यावेळी पलायन करून तो दडून बसला होता. त्याच्या शोधासाठी 5 लाख रुपयांचे इनाम जाहीर करण्यात आले होते. मागील वर्षभरापासून तो किश्तवाडमध्ये सक्रिय होता. त्याच्या अटकेची घडामोड सुरक्षा दलांचे मोठे यश आणि तोयबासाठी हादरा मानली जात आहे.