अज्ञात व्यक्तीने विहिरीत टाकले विषारी औषध; संबंधितावर कारवाई करण्याची मागणी

नगर: जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता वाढत असून पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली असताना नेवासा तालुक्‍यातील झापवाडी येथे अज्ञात व्यक्तीने विहिरीत विषारी औषध टाकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले असून संबंधितावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

नेवासा तालुक्‍यातील झापवाडी येथील बाबासाहेब भानुदास वाघ यांच्या मालकीच्या शेत जमिनी गट नंबर 81 मध्ये पिण्याच्या पाण्याची विहिर आहे. अज्ञात व्यक्तीने पिण्याच्या पाण्याच्या पाइपलाइन व विहिरीमध्ये विषारी औषधे टाकली असल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवार (दि.11) रोजी उघडकीस आला आहे.

याबाबत सोनई पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. परंतु अद्यापही यासंदर्भात पोलीस प्रशासनाने कुठलीही कारवाई केली नाही. ही बाब अत्यंत गंभीर स्वरूपाची असून, या घटनेचा शोध घेवून संबंधितावर कारवाई करावी. सध्या दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे पाण्यावाचून कुटुंबाचे हाल होत आहेत. तसेच विषारी औषध विहीरीमध्ये टाकल्याने माझे दोनशे होऊन अधिक डाळिंबाचे झाडे नाईलाजास्तव काढून टाकावे लागले.

याप्रकरणी कसून चौकशी होऊन पिण्याच्या पाण्यामध्ये विषारी औषधे टाकणाऱ्यावर कारवाई करावी. या कृत्यामूळे आमच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. येत्या आठ दिवसात कुठलीही कारवाई न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा निवेदनकर्त्यांनी दिला आहे. एकीकडे जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यासाठी प्रशासन जिल्ह्यात ठिकाणी टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करत आहे. तर दुसरीकडे असे प्रकार होत आहेत. या गंभीर घटनेकडे प्रशासनाने लक्ष दिले पाहिजे.

Leave A Reply

Your email address will not be published.