देशातील पथदर्शी प्रयोगाची नाणेघाटात अंमलबजावणी
जुन्नर – हाय व्होल्टेज डायरेक्ट करंट (एचव्हीडीसी) या तत्त्वावर 500 केव्हीचा क्षमतेचा आणि 1 हजार 500 मेगावॅट विद्युतप्रवाह वाहून नेणाऱ्या राज्यातील एकमेव टॉवरलाईनचे फॉल्ट शोधून, तांत्रिक दुरुस्तीसाठी आता महागडे ड्रोन वापरात येत आहेत. त्याचा पथदर्शी प्रयोग सध्या नाणेघाटात सुरु आहे. तसेच 20 वर्षांपूर्वी फ्रान्स तंत्रज्ञांनी तयार केलेले; परंतु आता त्यात काहींमध्ये दोष निर्माण होऊन बदलणे गरजेचे असलेले इन्सुलेटर बदलासाठीही ड्रोन प्रणालीचा उपयोग करण्यात येत आहे. यासाठी तीन महिन्यांपूर्वी 40 लाख रुपये खर्च करुन ड्रोन खरेदी करण्यात आला असून, फॉल्ट शोधून दुरुस्तीच्या कामाची सुरुवात नुकतीच नाणेघाटातटॉवरलाइन भागात सुरु झाली आहे.
तब्बल 40 मीटर उंचीवर असणाऱ्या टॉवरवरील विद्युततारांमधील फॉल्ट शोधणे यापूर्वी माणसाला करावे लागत होते. अत्यंत उंचीवर लाईनमन चढून हे फॉल्ट शोधत असत. त्यावेळी मानवी दृष्टीच्या मर्यादा यासाठी काही वेळा अडथळा ठरत; मात्र हे फॉल्ट शोधण्यासाठीच्या ड्रोनमधील कॅमेरे 100 मेगापिक्सल क्षमतेचे आहेत. त्यामुळे अत्यंत सूक्ष्म भाग देखील झूम करून त्यातील दोष शोधता येत आहेत. तब्बल 40 लाख रुपये किंमतीचा महागडा ड्रोन यासाठी वापरला जात आहे. अर्धा किमी उंची आणि 7 किमी परिघातील टॉवरलाईन कक्षेत असलेले फॉल्ट हा ड्रोन कॅमेऱ्याद्वारे शोधू शकतो. त्यासाठी जमीनीवरुन रिमोट नियंत्रीत करुन हे काम होते. त्यामुळे हे दोष शोधण्यासाठी लागणारा वेळ, खर्च, तसेच मानवी रिस्क कमी करणे शक्य झाले आहे. ही माहिती महाट्रान्सको कंपनीचे अधीक्षक अभियंता संदीप कळंत्री यांनी दिली.
यापूर्वी काही वेळा टॉवरलाइन बंद पडली की फॉल्ट शोधण्यासाठी लाइनमनला चाळीस मीटरपर्यंत चढून ते शोधावे लागत होते. ते आता टाळता येते आणि पूर्णत: मानवी सुरक्षेच्या दृष्टीने तंत्रज्ञानाच्या माध्यमातून टाकलेले हे पाऊल आहे. भारतात विद्युतधारा वाहून नेणाऱ्या अनेक टॉवरलाईन आहेत; परंतु डीसी प्रकारे ही विद्युतधारा वाहून नेणारा हा राज्यातील एकमेव प्रकल्प असून 20 वर्षांपासून विनासायास कार्यरत असणारा हा देशातील एकमेव आहे. त्यामुळे या टॉवरलाइनच्या 20 वर्षांनंतर बदलावे लागणारे इन्सुलेटर जे फ्रान्स बनावटीचे होते. ते आता बदलावे लागणार आहेत.
हे इन्सुलेटर बनविताना वापरलेली काच फुटल्यावर त्याचे तुकडे ज्या परिसरात टॉवर आहे. ते इतरत्र शेतात पसरून शेतकऱ्यांना दुखापती होत असल्याच्या तक्रारी होत्या, त्यामुळे नव्याने बसवायचे इन्सुलेटर भारतीय बनावटीचे आता लावले जात आहेत. त्यामध्ये काचेचे तुकडे होऊन इजा होण्याचा संभव टळला आहे. हे भारतीय बनावटीचे इन्सुलेटर 1 वर्षांपर्यंत वापर तत्वावर बसविण्याची तयारी कंपनीने दाखवली आहे. एक वर्ष वापरात त्याच्या गुणवत्तेची पारख करुन त्यानंतर ते पूर्ण क्षमतेने बदलण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे.
या तिघांवर जबाबदारी –
या टॉवरलाइनचा चंद्रपूर पासून 250 किमी अंतरातील देखभाल जालनाचे या विभागाचे कार्यकारी अभियंता आदिनाथ भाले पाहत असून, पडघा पासून 500 किमी अंतरातील देखभाल या विभागाचे राजगुरुनगर येथील कार्यकारी अभियंता दिपक मदने पाहत आहेत. हे काम सध्या नाणेघाटात या सर्व टीमच्या देखरेखीखाली सुरु आहे. तर ड्रोन ऑपरेटींगसह त्याच्या कार्यप्रणालीची कार्यवाही अभियंता आशिष सिंह करीत आहेत.
एचव्हीडीसी प्रकल्पाचे फायदे…
प्रकल्पप्रणाली पेक्षा होणारा विजेचा अपव्यय अत्यंत कमी
प्रकल्पापेक्षा प्रकल्प उभारणीचा खर्च अत्यंत कमी
प्रकल्पापेक्षा विद्युतधारेची पातळी अधिक वाढविण्यापची क्षमता