पुणे – घाटमाथ्यावर गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून जिल्ह्यातील निसर्गरम्य ठिकाणी जाताना पर्यटकांनी काळजी घेण्याचे आणि नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
लोणावळा, खंडाळा, लोहगड, पवना धरण परिसर, सिंहगड, मढेघाट आदी ठिकाणी पर्यटनाला जाताना काळजी घेण्याचे आणि नियमांचे पालन करण्याचेही आवाहन करण्यात आले आहे. नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई देखील करण्यात येणार आहे.
पावसाळ्यात नदीकाठची गावे, धरणांच्या पाणलोट क्षेत्राच्या परिसरातील ठिकाणे, गड-किल्ले, पर्यटन स्थळे, डोंगरातून कोसळणारे धबधबे अशा निसर्गरम्य ठिकाणी पर्यटकांची दरवर्षी गर्दी होते.
या ठिकाणी पहिल्यांदाच जाणार असाल आणि त्या ठिकाणी पाऊस, दाट धुके असेल, तर स्थानिक गावातील एखादा मार्गदर्शक सोबत न्यावा. पाऊस मोठ्या प्रमाणावर पडत असल्याने दाट धुके असल्यास गाडीचे दिवे आणि पार्किंग दिवे सुरू ठेवून गाडी चालवावी. पर्यटनस्थळी सुरक्षारक्षक भिंती, लोखंडी कडे नसल्याने धबधब्याच्या प्रवाहात उतरू नये, सर्व पर्यटकांची सायंकाळी चार वाजण्यापूर्वी परतीच्या प्रवासाला लागावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.