मुंबई – लोणावळा येथील भुशी धरणावर झालेल्या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कारवाईचे आदेश दिले आहेत. संध्याकाळी सहानंतर पर्यटनस्थळी फिरण्यास पर्यटकांना बंदी घालण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतला आहे. या निर्णयाकडे डोळेझाक करणाऱ्या पर्यटकांवर आणि कामात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे.
लोणावळा येथील धबधब्यात अन्सारी आणि सय्यद कुटुंबातील पाच जण वाहून गेले. त्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला जात आहे. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाचे निर्णय घेतला.
लोणावळ्यात हुल्लडबाजी आणि स्टंट करण्याच्या नादात अनेकांना जीव गमवावा लागला आहे. अशा हुल्लडबाज तरुणांवर कठोर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. हुल्लडबाज स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात टाकतात. त्यांची हुल्लडबाजी यानंतर सहन केली जाणार नसल्याचे निर्देश देण्यात आले.
रात्री अनेक तरुणांचे ग्रुप हे पर्यटनस्थळी गोंधळ घालतात. यासंबंधीच्या अनेक तक्रारी आलेल्या होत्या. त्यामुळे पर्यटनस्थळी आता संध्याकाळी सहानंतर पर्यटकांना फिरण्यास बंदी घालण्यात आली आहे.
या निर्णयाचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. कामात कुचराई करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाईचेही आदेश दिले आहेत. तसेच नवी नियमावलीचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.