पुणे – अनलॉकच्या प्रक्रियेत महापालिकेने मंदिरे, उद्याने, जिम, जलतरण तलाव सुरू करण्यास मान्यता दिली. पण, शहरातील पर्यटनस्थळे, संग्रहालये अजूनही बंदच आहेत. त्यामुळे ही ठिकाणे खुली करण्याची मागणी होत आहे. मात्र, संभाव्य गर्दी लक्षात घेऊन तूर्त ही स्थळे बंदच ठेवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.
शहरात डिसेंबर आणि जानेवारीत दुसऱ्या लाटेचा इशारा यापूर्वीच देण्यात आला आहे. ही संभाव्य रुग्णवाढ लक्षात घेऊन अनलॉक प्रक्रियेत गर्दी होणार नाही, याची खबरदारी महापालिकेने घेतली आहे.
शहरात मंदिरे, चित्रपटगृहे, नाट्यगृहे, जलतरण तलाव, मैदाने खुली आहेत. मात्र, त्याचवेळी पर्यटकांची गर्दी होणारे राजीव गांधी प्राणिसंग्रहालय, शनिवारवाडा, आगखान पॅलेस, केळकर संग्रहालय, महात्मा फुले संग्रहालय अशा वास्तू बंदच ठेवल्या आहेत. त्या खुल्या करण्याची मागणी वेगवेगळ्या संस्था, संघटना करत आहेत.