पवना धरण परिसरातील पर्यटन असुरक्षित!

धोक्‍याची घंटा : पाणलोट क्षेत्राला “सुरक्षिततेचे कवच’ कधी मिळणार

मावळ – मावळ तालुक्‍यातील पवना धरण परिसर पर्यटनासाठी वरदान ठरला आहे. पावसाळ्यात डोंगर कड्यावरून कोसळणारे धबधबे नेहमी मोहिनी घालतात. नागमोडी वळणे पानापुलांनी बहरलेल्या विस्तीर्ण जंगलाचे सौंदर्य मनाला स्पर्शून जाते. पवनाधरण हे बारमाही पर्यटन पर्यटकांमध्ये दरवर्षी किमान 20-25 हून अधिक पर्यटकांना जलसमाधी मिळत आहे. असुरक्षित झालेल्या पवना पाणलोट क्षेत्राला “सुरक्षिततेचे कवच’ कधी ही बाब अधोरेखित झाली आहे.

पवन मावळ हा परिसर पुणे-मुंबई शहरांचे मध्यवर्ती ठिकाण. या ठिकाणाहून थंड हवेची अनेक ठिकाणे जवळ असल्याने परिसरात मोठ्या प्रमाणावर पर्यटक येत असतात; परंतु परिसरातील पवना धरण हे अनेकांना जलसमाधी मिळाली आहे. या ठिकाणी सुरक्षिततेचा अभाव आहे. उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.
पवना धरण परिसराचा परिसर सर्वत्र विखुरलेला आहे. काही ठिकाणी तारेचे कुंपन, तर काही ठिकाणी मोकळे असल्याने पर्यटक भिजण्याचा आनंद घेण्यासाठी जलाशयात उतरत असतो; परंतु या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे सूचना फलक नाहीत किंवा तोंडी सूचना दिल्या जात नाहीत. त्याचबरोबर एप्रिलच्या दिवसांत धरणाच्या पाण्यात बुडून तीन जणांच्या मृत्यूची नोंद लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये करण्यात आली आहे. पर्यटनासाठी येणाऱ्यांमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थी व आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या तरुणांचा समावेश असतो.

पर्यटनाच्या दृष्टीने पवन मावळ हा परिसर नावारूपाला येत आहे. या ठिकाणी सुटीच्या दिवशी, तसेच शनिवारी आणि रविवारी मोठ्या प्रमाणावर पर्यटक राज्य व परराज्यांतून येत असतात. परंतु अशा प्रकारे काही घटना घडल्यास पर्यटक नाराज होताना दिसतात. धरण परिसरात प्रेक्षणीय ठिकाणी सूचना फलक लावण्यात यावेत. पाटबंधारे विभागाकडे पुरेसा कर्मचारी वर्ग आहे. कर्मचाऱ्यांना प्रेक्षणीय स्थळावर नेमणूक करून त्या ठिकाणी सूचना देण्यासाठी थांबविण्यात यावे. पोलिसांनी यावर नियंत्रण ठेवण्यासाठी मदत करावी.

सूचनाफलक लावण्याची पाटबंधारे विभागाची तयारी

पवना धरण परिसरात सूचना फलक लावले असून, ज्या ठिकाणी सूचनाफलक नाही त्या ठिकाणी लवकरच फलक लावण्यात येतील. तसेच पाटबंधारे विभागाच्या कर्मचाऱ्यांना पर्यटकांना पाण्यात जाऊ नये यासाठी सूचना देण्यात याव्यात, असे कळविण्यात आले आहे, असे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले आहे.

धरण परिसरात मोठ्या प्रमाणावर हॉटेल व्यवसाय असून, या ठिकाणी बेकायदा दारू विक्री केली जात आहे. याकडे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे व पोलिसांचे सर्रासपणे दुर्लक्ष होत आहे. त्यावर पवना धरण परिसरातील हॉटेलमध्ये मिळणारी बेकायदा दारू विक्री बंद करावी, अशी मागणी जोर धरीत आहे.

स्थानिक नागरिक म्हणतात…

पाटबंधारे विभागाच्या वतीने धरण क्षेत्रात सूचनाफलक लावण्यात यावेत. पाटबंधारे विभागाकडे पुरेसा कर्मचारी वर्ग असून, त्याचा कोणत्याही प्रकारचा उपयोग होताना दिसत नाही. यावर पाटबंधारे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून पवना धरण परिसरात सूचना फलक व धरण क्षेत्रातील वर्दळीच्या ठिकाणी एका कर्मचाऱ्याची नेमणूक करण्यात यावी. तसेच पोलिसांनीही बंदोबस्त ठेवावा. त्यामुळे धरण परिसर अधिक सुरक्षित वाटेल.

पवन मावळ हा परिसर शहराच्या हाकेच्या अंतरावर आहे. परिसरात अनेक औद्योगिक क्षेत्र मोठ्या प्रमाणावर असल्याने या ठिकाणी काम करणाऱ्या तरुण-तरुणी आणि महाविद्यालयीन विद्यार्थी सुटीच्या दिवशी पवन मावळ परिसरातील पवना धरण, किल्ले लोहगड, विसापूर, तुंग, तिकोणा, बेडसे लेणी या भागात फिरण्यासाठी येत असतात. परिसरात छोटे-मोठे हॉटेल व्यवसाय आहेत. त्यामुळे या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना राहण्याची आणि जेवणाची उत्तम सोय केली जात असते. परंतु पोलीस व पवना धरण पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षित कारभारामुळे या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना जीव मुठीत धरून आनंद साजरा करावा लागतो.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.