पिंपरी (प्रतिनिधी) – जगभरातील लोकांनी सध्या करोना व्हायरसची धास्ती घेतली आहे. त्याचा फटका पर्यटन व्यवसायाला देखील बसला आहे. पर्यटन व्यवसाय जवळपास 30 ते 40 टक्क्यांनी घटला आहे. विदेशी सहलींचे बुकिंग 25 टक्क्यांनी रद्द झाले आहे. प्रवासी वाहतूक करणाऱ्या व्यावसायिकांना नुकसानीची चांगलीच झळ सोसावी लागत आहे.
शहरातील ट्रॅव्हल्स व्यावसायिकांकडे बुकींग करणाऱ्या विदेशी तसेच भारतीय पर्यटकांची संख्या घटली असल्याची माहिती व्यावसायिकांनी दिली. खासकरून जपान, मलेशिया, इंडोनेशिया, दिल्ली, मालदिव यासह युरोपातून येणाऱ्या पर्यटकांचे प्रमाण लक्षणीयरित्या घटल्याचे व्यावसायिकांनी सांगितले. करोनाच्या प्रभावामुळे विदेशी पर्यटकांनी दिल्लीसह करोना प्रभावित भागात जाण्यास नकार दिला आहे. एवढेच नव्हे तर देशातील हौशी पर्यटक देखील जवळपासच्या ठिकाणी तसेच देशातंर्गत पर्यटन करण्यास घाबरत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. पर्यटकांचे आकर्षण असणाऱ्या शहरातील तसेच देशातील विविध भागात आता विरळ गर्दी आहे.
भारतात करोना व्हायरस बाधित रुग्णांचे प्रमाण खुपच नगण्य आहे. टूरिस्ट कंपन्यांना मोठ्या प्रमाणात नुकसानीचा सामना करावा लागत आहे. 25 टक्के विदेशी सहलींचे बुकिंग रद्द झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पर्यटन व्यवसायातील कंपन्यांसह पर्यटकांचेही नुकसान होत आहे. हवाई वाहतूक करणाऱ्या कंपन्यांकडून बुकींग रद्द करतांना जेवढी परतावा रक्कम मिळेल तेवढीच रक्कम प्रवाशांना दिली जाणार आहे. त्यांनी त्यासाठी नकार दिल्यास परतावा रक्कम (रिफंड) मिळणार नसल्याची माहिती व्यावसायिकांनी दिली.
आमच्यातर्फे ग्रुपने टूर्स ऍरेंज करून दिल्या जातात. चालू महिन्यात 8 ते 10 बुकिंग रद्द करण्यात आले आहेत. मलेशिया, मालदिव व दिल्ली यासह विविध ठिकाणचे बुकींग रद्द करण्यात आले आहे. एअरलाईन्सकडून ज्या प्रमाणात रिफंड देण्यात येते, त्या प्रमाणात प्रवाशांना पैसे परत दिले जातात. चीन, मलेशिया व इंडोनेशिया या देशातून येणारे व्यावसायिक व पर्यटक करोनामुळे भारतात येण्यास घाबरत आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत 25 टक्क्यांनी व्यवसाय घटला आहे.
– दिनेश मालू, टूरिस्ट व्यावसायिक.
“करोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काळजी घेण्याची गरज’
पिंपरी – शहरामध्ये करोना व्हायरसचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी महापालिकेने आवश्यक काळजी घ्यावी. तसेच, शहरातील रूग्णालयांच्या माध्यमातून त्याबाबत आवश्यक उपाययोजना करण्यात याव्या, अशा सूचना आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे यांनी महापालिका प्रशासनाला केल्या आहेत.
आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या समवेत चिंचवड येथील ऍटो क्लस्टरमध्ये आयोजित बैठकीत त्यांनी ही सूचना केली. जगभरात करोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्याच बरोबरीने देशभरात आणि महाराष्ट्रातही करोनाचे संशयित रूग्ण सापडत आहेत. या पार्श्वभूमीवर शहरात करोनाचा फैलाव होऊ नये, यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यासाठी ही बैठक घेण्यात आली.
सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, माजी स्थायी समिती सभापती विलास मडीगेरी आदी उपस्थित होते. शहरातील सर्व सरकारी, खासगी रुग्णालयातील प्रमुख अधिकारी व पालिका प्रशासन यांची याबाबत लवकरच बैठक घेऊन त्यासाठी सूचना करण्यात याव्यात, असेही बैठकीत स्पष्ट करण्यात आले.