एसटी कर्मचाऱ्यांना पर्यटनाचे पॅकेज

एसटी महामंडळाचा निर्णय

पुणे – सणासुदीच्या काळातही प्रवाशांना अविरत सेवा देणाऱ्या वाहक, चालक आणि अन्य कामगारांना अनोखी भेट देण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. या वाहक आणि चालकांना पर्यटन करता यावे, यासाठी त्यांना नामांकित ट्रॅव्हल्स कंपनीच्या माध्यमातून सवलतीच्या दरात पॅकेज उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. त्यासाठी दोन ट्रॅव्हल्स कंपनीशी चर्चा करण्यात आली असून या कंपन्यांनी या प्रस्तावाला मान्यता दिली आहे.

एसटी महामंडळाचे राज्यात तब्बल सव्वालाख कर्मचारी आहेत. त्यामध्ये वाहक आणि चालकांची संख्या सर्वाधिक आहे. एसटी बसेस ही अत्यावश्‍यक सेवा असल्याने वाहक, चालकांना त्यांची साप्ताहिक सुट्टी आणि हक्काच्या रजांच्या शिवाय अन्य सुट्टया घेता येत नाहीत. सणासुदीच्या आणि सुट्टयांच्या कालावधीत तर त्यांना कामावर हजर राहावेच लागते, त्यामुळे त्यांना कुटुबीयांच्या समवेत साधा सणही साजरा करता येत नाही. त्याशिवाय त्यांना कुटुंबीयांसह फिरण्यासाठी महामंडळाच्या वतीने वर्षाला पास देण्यात येत असतो.

मात्र, बहुतांशी कामगारांना कामाच्या वाढत्या व्यापामुळे या पासचाही उपभोग घेता येत नाही. त्याची गंभीर दखल महामंडळाच्या मुख्य कार्यालयाने घेतली आहे. या कामगारांना कामाच्या व्यापातून उसंत मिळावी आणि त्यांना कुटुंबीयांसह पर्यटनाचा आनंद लुटता यावा, यासाठी त्यांना नामांकित ट्रॅव्हल्स कंपनीच्या माध्यमातून हे पॅकेज उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.