टूर कॅन्सल…, कुछ तो रिफंड ‘करो’ना

आयोजक कंपन्या आणि ग्राहकांमध्ये वाद; पर्यटन मंत्रालयाकडून कोणतेही निर्देश नाहीत

पुणे – पर्यटन मंत्रालयाकडून कोणत्याही स्वरूपात निर्देश दिले गेलेले नसल्याने पर्यटक तसेच टूर ऑपरेटरचे मोठे नुकसान होत आहे. टूर कंपन्यांनी पर्यटनासाठी निघालेल्यांना सहा महिन्यांपासून दिलेल्या सेवा, कंपनीच्या कार्यालयाचा खर्च, बॅंकेचे हप्ते, कर्मचाऱ्यांचे पगार, जाहिरातींचा लाखो रुपयांचा खर्च हे सर्व कुठून येणार? तसेच पुढचे सहा महिने करोनामुळे पर्यटक टूर बुक न करण्याची भीती कायम आहे. पर्यटक टूर कॅन्सल करीत असून भरलेली पूर्ण रक्‍कम परत मागत आहेत. ते देणे शक्‍य होत नसल्याने त्यापैकी काही तरी रक्‍कम परत करण्याची “टूरटूर’ पर्यटकांकडून सुरूच असल्याने टूर ऑपरेटर दुहेरी कोंडीत सापडले आहेत.

करोनामुळे पर्यटन व्यावसायातील महत्त्वाचा दुवा असलेल्या टूर कंपन्यांचा आर्थिक कणा मोडला आहे. आर्थिक तोट्याबरोबरच टूर व्यावसायिकांना ग्राहकांकडून मोठा मनःस्ताप स्वीकारावा लागत आहे. रद्द झालेल्या टूरचा परतावा (रिफंड) पूर्णपणे मिळावा, अशी मागणी ग्राहक आणि ग्राहक संघटनांकडून होत आहे. ग्राहकांच्या मनातील गैरसमज दूर करण्यासाठी टूर व्यावसायिकांना मोठा प्रयत्न करावा लागत आहे.

करोनामुळे देश-परदेशातील अनेक नियोजित टूर रद्द झाल्याने रिफंड मिळण्यावरून टूर व्यावसायिक आणि ग्राहकांमध्ये छोटे-मोठे वाद उद्‌भवत आहेत. परदेशातील तसेच देशांतर्गत टूरचे बुकिंग काही महिने अगोदर करण्यात येते. परदेशातील टूरचे बुकिंग तर सात ते आठ महिने अगोदर होते. यासाठी टूर कंपन्यांना विमानसेवा देणाऱ्या कंपन्यांना आगाऊ पेमेंट करावे लागते. विमान कंपन्यांबरोबरच हॉटेल बुकिंग, ट्रान्स्पोर्ट, साईट सिईंग यांचीही रक्कम आगाऊ अदा करावी लागते.

करोनामुळे ग्राहक स्वत: टूर रद्द करत आहेत. तर काही देशांनी पर्यटनावर बंदी घातल्यानेही टूर रद्द झाल्या आहेत, अशा वेळी बुकिंगची दिलेली आगाऊ रक्कम परत मिळताना अनेकदा विमान कंपन्यांकडून त्यातील काही रक्कम कॅन्सलेशन चार्जेस म्हणून कमी करून दिली जाते. तर काही विमान कंपन्या रिफंड न देता पुढील काही महिन्यांच्या तारखांचे बुकिंग देतात. हॉटेल व्यावसायिकही असेच करताना दिसत आहेत. तर, काही हॉटेल व्यावसायिक आमच्याकडे पर्यटनाला बंदी नाही, तुम्ही स्वत: टूर रद्द करत आहात, यामुळे पैसे

मिळणार नाही, पाहिजे तर तारखा बदलून देऊ, अशी भूमिका घेत आहेत. यामध्ये टूर व्यावसायिक व ग्राहक दोघांचीही चूक नाही. मात्र, व्यावसायिक आणि ग्राहक यांचे संबंध रिफंडवरून बिघडत आहेत.

का मिळू शकत नाही “रिफंड’
केंद्र सरकार आणि पर्यटन मंत्रालयाने पर्यटनासंदर्भात कोणतीही भूमिका मांडलेली नाही. विमान कंपन्यांनाही रिफंडसंदर्भात कोणतेही निर्देश सरकारने दिलेले नाहीत. तसेच, कंपन्या किंवा हॉटेलजी काही रक्कम रिफंड करत आहेत ती व्हर्च्युअल स्वरूपाची आहे. रिफंड रक्कम टूर कंपन्यांच्या खात्यात आभासी स्वरूपात दाखवली जाते. टूर कंपन्यांना रद्द केलेल्या टूरच्या बदल्यात पुढील टूरच्या बुकिंगमधून पैसे कमी करण्याची हमी दिली जाते. यामुळे टूर व्यावसायिकांच्या हातात रिफंडची रक्कम मिळत नाही. मात्र, ग्राहक टूर बुकिंगची सर्व रक्कम रिफंड मागत आहेत. यावर पर्यटन विभागाने लवकर तोडगा काढावा, अशी मागणी टूर व्यावसायिकांकडून करण्यात येत असल्याचे ट्रॅव्हल असोसिएशन ऑफ पुणेचे (टॅप) संचालक निलेश भन्साळी यांनी सांगितले. आम्ही विश्‍वासाला कुठेही तडा जाऊ देणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.

ग्राहक संघटनेबरोबर बैठक…
शहरातील टूर व्यावसायिक कंपन्यांना ग्राहक संघटना आणि विमानसेवा देणाऱ्या कंपन्यांच्या अधिकाऱ्यांबरोबर नुकतीच एक बैठक आयोजित केली होती. या बैठकीत ग्राहक पंचायतीचे सूर्यकांत पाठक उपस्थित होते, त्यांनी ट्रॅव्हल एजंटच्या सर्व अडचणी समजावून घेतल्या. त्या सोडवण्यासाठी आपण प्रयत्न करू तसेच ग्राहक व पर्यटक या दोघांवरही अन्याय होणार नाही याची ग्वाही दिली. या बैठकीत झेलम चौबल, मिलिंद बाबर, विश्‍वास केळकर, दीपक पुजारी, संतोष खवले, मेहबूब शेख, हेमंत पै, विजय लोखंडे, मकरंद अंगल, राजेश अर्गे व इतर ट्रॅव्हल एजंट उपस्थित होते. शहरामध्ये टाप, टाई, टाफी, इटा, स्कॉल टूर संघटना असून करोनाच्या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाला मागील दीड महिन्यात परदेशात प्रवास केलेल्या पर्यटकांची माहिती देत आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.