पीएमपीएल प्रवासामध्ये अल्पवयीन मुलीला केला स्पर्श; आरोपीस तीन वर्षे सक्तमजुरी

पुणे – पीएमपीएल प्रवासात चुकीच्या पध्दतीने विनाकारण अल्पवयीन मुलीला स्पर्श करणाऱ्या 3 वर्षे सक्तमजुरी आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा विशेष न्यायाधीश एस.एच.ग्वालानी यांनी सुनावली. दंड न भरल्यास तीन महिने अतिरिक्त कारावास भोगावा लागणार असल्याचे आदेशात म्हटले आहे.

दिलीप जालंदर देशमुख (वय 41, रा. धायरी) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. पीडित मुलीने, तीच्या जबाबात आरोपीने पीएमपीएल बसस्टॉप येथे विनाकारण चुकीच्या पध्दतीने हात लावुन स्पर्श केल्याचे सांगितले. त्यामुळे केवळ हात लावणे हा गुन्हाच होऊ शकत नाही. म्हणून आरोपीस निर्दोष सोडण्याची मागणी बचाव पक्षातर्फे करण्यात आली.

यास सहायक जिल्हा सरकारी वकील विलास घोगरे पाटील यांनी विरोध केला. मुलीचे वय अवघे बारा आहे. सार्वजनिक ठिकाणी बसस्टॉपवर आरोपीचा पीडितेच्या शरीरास नेहमी हात लावण्याचा उद्देश, हा बाललैगिक अत्याचार कायदाच्या कलम 7 नुसार पीडितेचा विनयभंगच आहे. आरोपीस बाललैगिक अत्याचार प्रतिबंध कायदा 2012 कलम 8 नुसार शिक्षा देण्याची मागणी युक्तीवादात त्यांनी केली.

17 सप्टेंबर 2019 रोजी उंबऱ्या गणपती चौक ते माणिक बाग दरम्यान पीएमपीएल प्रवासात ही घटना घडली. याबाबत पीडितेच्या आईने सिंहगडरोड पोलिसात फिर्याद दिली आहे. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे चार साक्षीदार तपासण्यात आले. न्यायालयाने बाललैंगिक अत्याचार कायदा 2012 चे कलम 8 व 12 अन्वये दोषी ठरवून तीन वर्ष सक्तमजुरी व 10,000 रूपये दंडाची शिक्षा सुनावली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.