परिस स्पर्श

“गुरुजी, आजपासनं वाडीवरची पोरं पण शाळेत येणार हाईत. जाताना त्यांना संगती घेऊ.’ सायकल चढाला लागल्याने म्हात्रे गुरुजी खाली उतरले. दम लागला म्हणून उसासा घेत त्यांनी खांद्यावरच्या उपरण्याने कपाळावरचा घाम पुसला. “अंत्या, वडाखाली थांबू थोडा वेळ.’ गुरुजी वडाच्या बुंध्याला टेकून बसले. अंत्याने कॅरिअरला अडकवलेल्या कळशीचा दोर सोडला. “गुरुजी, म्या आलोच पाणी घेऊन.’ त्याने ओंझळीतून नदीतलं पाणी कळशीत भरून घेतलं. भरलेली कळशी खांद्यावर घेऊन येताना हिसळलेलं पाणी अंगावर सांडताना पाहून गुरुजी गडबडीने उठले आणि त्याच्या हातातली कळशी घेतली. “भिजलास ना. तुला नाही झेपत तर मला आवाज द्यायचा.’ “गुरुजी, नदीत लई लव्हाळं होतं.’ गुरुजींनी कॅरिअरला कळशी बांधत विचारलं, “काय शिकलास त्या लव्हाळाकडून?’ अंत्या कावराबावरा होऊन बघू लागला. गुरुजींनी हसून त्याच्या डोक्‍यावरून हात फिरवला. “माणसानं त्या लव्हाळासारखंच असावं. तेवढंच लवचिक. आयुष्याच्या प्रवाहात वाहत जाताना खाचखळगे येतील; कधी दुःखाचे पूरही येतील. स्वभावात शालीनता आणि थोडा नम्रपणा असला की झालं. संत तुकाराम म्हणतात, “महापूरे झाडे जाती। तेथे लव्हाळ वाचती ।।’ श्रेष्ठ म्हणून जगण्यापेक्षा लहान होऊन जगण्यातच खरा मोठेपणा. समजलं का?’

अंत्याला कितपत समजलं होतं माहीत नाही; पण थोडक्‍यात माणसाने गुरुजींसारखंच असावं! एवढं त्याला कळलं होतं हे मात्र नक्की. “ये किश्‍या, हणम्या चला लवकर.’ दोघे पळतच आले. डोक्‍यावरचा पदर सावरत त्यांच्या आईने विचारलं, “गुरुजी, फार्माचे किती पैसं होतील?’ “दोघांचे मिळून पन्नास रुपये.’ तिने पदरात गुंडाळून ठेवलेल्या दहाच्या दोन नोटा आणि काही चिल्लर काढली. “गुरुजी इस रुपय कमी भरत्यात.’ “ठेव ते पैसे तुझ्याकडे. फॉर्म भरतो मी. उद्या पोरांना चपला घे.’ गुरुजींनी पोरांना सायकलवर बसवले आणि निघून गेले. शाळा; दहा बाय दहाची एक खोली आणि बोटावर मोजण्याइतपत 10-12 मुलं. पुढं थोडंसं पटांगण आणि प्रवेशद्वार. अंत्याने आवाज दिला. “पोरांनो, प्रार्थनेसाठी रांगेत उभे राहा.’ प्रार्थना झाली आणि मुलं वर्गात जाऊन बसली. “बरं का मुलांनो; आज आपल्या शाळेत दोन नवीन मुलांनी प्रवेश घेतला आहे. आपण टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करू या.’ मुलांनी टाळ्या वाजवल्या. “बरं, आज आपण सुरुवात कशापासून करायची? मराठी, गणित का इतिहास?’ मुलांनी आवाज दिला. “इतिहास. कोंढाण्याची लढाई.’ दोन-एक तास तानाजी मालुसरेंची शोर्यगाथा ऐकण्यात सगळे तल्लीन झाले होते.’ …तर याला म्हणतात निष्ठा, राष्ट्रप्रेम, त्याग. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज शेवटी काय म्हणाले?’ मुलांनी एका सुरात उत्तर दिलं. “गड आला; पण सिंह गेला.’ वर्गातील मावळ्यांच्या अंगातसुद्धा उत्साह संचारला होता.

मधली सुट्टी झाली. मुलं झाडाखाली जेवायला बसली. रोज आपल्याबरोबर जेवायला बसणारे गुरुजी दिसत नाही म्हणून अंत्या वर्गात गेला. गुरुजींच्या हातात कसला तरी एक कागद होता. ते एकटक त्या कागदाकडे पाहत बसले होते. “गुरुजी, तुमि नाय जेवणार.’ गुरुजींच्या डोळ्यात नकळत पाणी होतं. त्यांनी कागदाची घडी केली आणि खिशात ठेवून दिला. “काय झालं गुरुजी?’ “मला भूक नाही. तुम्ही जेवून घ्या.’ दाराजवळ गेल्यावर तो पुन्हा काही वेळ थबकला; तेवढ्यात शाळेजवळ एक गाडी आली. गाडीतून दोघेजण खाली उतरून वर्गात गेले. “नमस्कार म्हात्रे सर.’ “साहेब तुम्ही! या ना या. बसा.’ गुरुजींनी बसायला खुर्ची दिली. “तालुक्‍याला मिटिंग होती. म्हटलं भेटून यावं तुम्हाला.’ अंत्या दाराच्या आड उभं राहून ऐकत होता. “सर, तुम्हाला पत्र तर मिळालं असेलच.’ गुरुजी केविलवाण्या चेहऱ्याने त्या साहेबांकडे पाहत होते. “पुढच्या दोन महिन्यात शाळा बंद करावी लागेल.’ “साहेब, पटसंख्या वाढेल. आजच दोन मुलांनी प्रवेश घेतला.’ “म्हात्रे सर, आम्हाला तुमची तळमळ दिसते; पण सिस्टमपुढे मी देखील हतबल आहे. कुठपर्यंत तुम्ही तरी ही शाळा जगवण्यासाठी खिशातले पैसे घालत बसणार? गेल्या पाच वर्षांत तुम्हाला कित्येकदा चांगल्या ठिकाणी बदली करून घेण्याचे योग आले होते.’

“साहेब, लळा लागलाय हो पोरांचा. आणि शाळा बंद केली तर कुठं जाणार ही पोरं शिकायला? सगळ्यांच्याच आई-बापाची हातावरची पोटं.’ “माफ करा सर.’ असं म्हणून ते अधिकारी जाऊ लागले. अंत्याने सगळं ऐकलं होत. आभाळ भरून आलं होतं. गुरुजींची नजर चुकवून त्याने सायकल घेतली व साहेबांच्या गाडीमागे निघाला. मुसळधार पाऊस चालू झाला. पुलावरून पाणी वाहू लागल्याने गाडी अलीकडेच थांबली होती. अंत्या कसाबसा गाडीजवळ पोचला. हातातली सायकल खाली टाकली. काचेवरून ओघळणारे पाणी पुसले व आत बघून त्यांना खुणावू लागला. साहेबाने काच खाली घेतली. “कोण तू? आणि पावसात कशाला भिजतोस?’ “मी अंत्या. शाळा बंद नका ना करू.’ धापा टाकत तो बोलू लागला. ते दोघेजण एकमेकांच्या तोंडाकडे पाहू लागले. “आमचे गुरुजी लई प्रेमळ आणि साधे हायत; लव्हाळासारखे. आणि तानाजी मालुसरे सारखे’ त्याला पुढे बोलायचे होते पण शब्द सुचत नव्हते. गाडीतून अधिकारी खाली उतरले. “तानाजी मालुसरे सारखे निष्ठावंत!’ “व्हय. निष्ठावंत. आमाला पण शिकून मोठं व्हायचंय.’ “बरं, तू जा शाळेत.’ “नाही ना करणार शाळा बंद?’ त्या अधिकाऱ्याने अंत्याच्या डोक्‍यावर हात ठेवला. “नाही करणार.’ अंत्याचे ते निरागस हात आपसूक अधिकाऱ्याच्या पायाला शिवले. अंत्या जोरजोराने पॅडल मारत शाळेकडं निघाला. पाठीमागे त्या अधिकाऱ्याची गाडी आली. सर ते लेटर कुठे आहे?’ गुरुजींनी खिशातून तो कागद काढून साहेबांकडे दिला. साहेबांनी तो फाडून टाकला. “सर. तुमची शाळा नाही बंद होणार. तुमच्यासारखीच तुमची मुलं पण निष्ठावंत आहेत. अंत्या शिकून खूप मोठा हो.’ असं म्हणून ते अधिकारी निघून गेले…

अमोल भालेराव

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.