जीवनगाणे: स्पर्शाची भाषा

अरुण गोखले

स्पर्श हा त्वचेच्या संवेदनेचा विषय आहे. स्पर्शाच्या अनुभवा बरोबरच अनेक अबोल, अव्यक्‍त अन्‌ शब्दातीत अशा मानवी भावभावना व्यक्‍त होतात. स्पर्शांनाही एक वेगळीच भाषा असते. त्यांचाही एक अबोल सुखसंवाद असतो.
लहान मूल रडत असताना त्याला कोण उचलून घेतंय, यावर त्याची प्रतिक्रिया अवलंबून असते. आपल्या मातेचा मायेचा स्पर्श त्याला न सांगता कळतो आणि काही वेळापूर्वी रडणारं ते छोटं बालक एकदम शांत होते. खुदकन त्याच्या गालावर एक हास्याची कळी फुलते. ही जादू असते त्या मातेच्या स्पर्शाची.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

बालपणाच्या निरागस स्पर्शांना एक वेगळाच अर्थ असतो. तर तारुण्यातल्या निसटत्या, ओझरत्या, हव्या हव्याशा वाटणाऱ्या प्रियव्यक्‍तीच्या स्पर्शाची भाषाही आणखी काही वेगळेच बोलत असते. त्या भावभावना न बोलून दाखवताही एकमेकांना अगदी सहजपणे कळत असतात, एक अबोल संवाद साधत असतात.

वाढत्या वयाबरोबर माणसाला हवा हवासा वाटत असतो तो आधाराचा स्पर्श. या वयातल्या सापेक्ष स्पर्शाला एकच भावना अपेक्षित असते ती म्हणजे आधार. असा आधार ज्या हातातून मिळतो ते हात विश्‍वासाने हाती धरून ठेवले जातात. अशा दुरावणाऱ्या आधार स्पर्शांच त्यावेळच्या दु:खाची कल्पनाही करता येत नाही.

माणसाला लहानपणापासूनच अशा अनेक स्पर्शांची चांगलीच ओळख झालेली असते. प्रत्येक स्पर्शातली भावभावना, कामना आणि वासना या गोष्टी तो चटकन ओळखतो. त्यामुळेच काही हात प्रेमाने धरून ठेवले जातात, तर काही झिडकारलेले जातात. काही स्पर्श हवेसे वाटतात तर काही तर जाणीवपूर्वक टाळलेही जातात.

प्रत्येक स्पर्शाची एक कसोटीची वेळ असते. त्यावेळी त्याची परीक्षा होते आणि त्याची निवड, केव्हा त्याग केला जातो. सहकार्य, मदत, आपुलकी, जिव्हाळा, प्रेम, माया, या उच्च आणि उदात्त अशा भावनेने जाणवणारा स्पर्श एकच भाषा बोलत असतो, ती म्हणजे माणुसकी, सहृदयता आणि सहानुभूतीची.

संकट काळी, आपातकालीन जेव्हा एकमेकांना त्या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी सहानुभूतीचा हात पुढे केला जातो. त्यावेळी पुढे आलेल्या लहान-मोठ्या, स्त्री-पुरुष यांच्या पुढे आलेल्या हातातून एकच भाषा बोलली जाते ती म्हणजे आधार.

आधारस्पर्श जीवांना जगवणारा, बुडणाऱ्याला तारणारा, मरणाऱ्याला जीवदान देणारा, आणि उद्‌ध्वस्त जीवनांना नव्याने परिस्थितीवर मात करून नव्या जिद्देने जगण्यासाठी उदुक्‍त करणारा असतो. अशा देवमाणसांच्या परिसस्पर्शाने अनेकांना खऱ्या अर्थाने जगवले आणि जगवले जाते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)