वाहन, धातू, ऊर्जा, पायाभूत सुविधा दूरसंचार क्षेत्रातील कंपन्या तेजीत
मुंबई – सोमवारी सकाळी शेअरबाजारात बरीच खरेदी होऊन निर्देशांक उच्च पातळीवर गेले होते. सकाळी मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स तब्बल 400 अंकांनी उसळून 39,115 अंकापर्यंत गेला होता. मात्र, नंतर बरीच नफेखोरी झाली. तरीही शुक्रवारच्या तुलनेत सोमवारी सेन्सेक्स 198 अंकांनी म्हणजे 0.51 टक्क्यांनी वाढून 38871 अंकांवर बंद झाला.
वाहन, माहिती तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरच्या भावात जागतिक बाजारातून सकारात्मक संदेश आल्यामुळे वाढ झाली. सोमवारी राष्ट्रीय शेअरबाजाराचा निर्देशांक एक वेळ 11700 अंकांपर्यंत वाढला होता. बाजार बंद होताना सोमवारी निफ्टी 45 अंकांनी म्हणजे 0.27 टक्क्यांनी वाढून 11669 अंकावर बंद झाला.
टाटा मोटर्स, वेदांत, भारती एअरटेल, मारुती, रिलायन्स, टाटा स्टील या कंपन्यांचे शेअर सोमवारी 7.37 टक्क्यापर्यंत वाढले.
त्याचबरोबर इन्फोसिस, टीसीएस, स्टेट बॅंक, आयटीसी, एस बॅंक, कोटक बॅंक, हिरो मोटो आणि कोल इंडिया या कंपन्यांचे शेअरही सोमवारी वाढले. मात्र या तेजीच्या परिस्थितीतही इंडसइंड बॅंक, महिंद्रा, ऍक्सिस बॅंक, पॉवर ग्रीड, एचडीएफसी, ओएनजीसी, बजाज फायनान्स, एचडीएफसी बॅंक या कंपन्यांचे शेअर घसरले.
धातू क्षेत्राचा निर्देशांक आज सर्वात जास्त म्हणजे 2 टक्क्यांनी वाढला. माहिती तंत्रज्ञान, ऊर्जा, दूरसंचार आणि वाहन कंपन्यांच्या शेअरचे भाव सोमवारी वाढले. तर ग्राहक वस्तू या क्षेत्राचे निर्देशांक कमी झाले. अमेरिका आणि चीनदरम्यानचे व्यापारयुद्ध थंडावण्याची चिन्हे दिसत असल्यामुळे अमेरिका, चीन आणि युरोपातील शेअरबाजार निर्देशांक वाढले होते. त्यामुळे भारतातही सकारात्मक वातावरण होते. दरम्यान आता शेअरबाजार निर्देशांक विक्रमी पातळीच्या समीप आले आहे. त्याचबरोबरच लोकसभा निवडणुकांची प्रचार रणधुमाळी चालू आहे. त्यामुळे गुंतवणूकदार सावध राहण्याची शक्यता आहे.