वाराणसीत मंदिर परिसरात मांसाहाराला बंदी

वाराणसी महापालिकेच्या बैठकीत ठराव

वाराणसी – उत्तर प्रदेशातील वाराणसीतील सर्व मंदिरे आणि अन्य धार्मिक स्थळांच्या 250 मीटर परिघात दारू, मांसाहाराची विक्री आणि सेवनावर प्रशासनाने पूर्ण बंदी घातली आहे. हा निर्णय महापौर मृदुला जायसवाल यांच्या अध्यक्षतेखाली वाराणसी महापालिकेच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत घेण्यात आला.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी यापूर्वीच एप्रिलमध्ये वाराणसी, वृंदावन, अयोध्या, चित्रकूट, देवबंद, देवा शरीफ, मिश्रीख-नैमिशारण्य येथील सर्व पूजास्थळांवर दारूची दुकाने आणि मांसाहारी भोजनावर प्रतिबंध लादण्याची घोषणा केली होती.
त्यानुसार त्यांनी अबकारी खात्याच्या अधिकाऱ्यांना वाराणसीतील काशी विश्वनाथ मंदिर, मथुरेतील कृष्ण जन्मभूमी आणि अलाहाबाद येथील संगम क्षेत्रात एक किलोमीटर अंतरापर्यंत दारूच्या विक्रीवर पूर्णपणे बंदी घालण्याचे निर्देश दिले.

वाराणसी महानगरपालिकेचे उपाध्यक्ष नरसिंह दास यांनी याबाबत सांगितले की, ठरावानुसार हरिद्वार आणि अयोध्येप्रमाणेच वाराणसीमध्येही मंदिर परिसरात आणि धार्मिक स्थळांजवळ दारू, मांसाहाराच्या विक्री आणि सेवनावर पूर्णतः बंदी घालण्याचे आम्ही ठरवले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.