रेमडेसिविरनंतर आता ‘टॉसिलिझूमॅब’, ‘अलझूमॅब’ इंजेक्‍शन्सही आऊट ऑफ स्टॉक!

नशिबी हतबलता अन्‌ वणवण…! 40 हजार रुपये देऊ, पण इंजेक्‍शन मिळण्यासाठी आर्जव

पुणे – ‘रेमडेसिविर’ नंतर आता “टॉसिलिझूमॅब’ (ऍकटेम्रा) आणि “अलझूमॅब’ या इंजेक्‍शनच्या प्रिस्क्रिप्शन घेऊन करोना बाधितांचे नातेवाईक सध्या मेडिकल दुकाने पालथे घालत आहेत. श्‍वास घेण्याला त्रास होतो, रुग्ण अत्यवस्थ या सगळ्या गोष्टींच्या पार्श्‍वभूमीवर नातेवाईक या इंजेक्‍शनसाठी हजारो रुपये खिशात घेऊन, अक्षरश: हवालदिल होऊन हे इंजेक्‍शन शोधत आहेत.

‘टॉसिलिझूमॅब’ इंजेक्‍शन “आऊट ऑफ स्टॉक’ असल्याने ते कधी मिळेल हे मेडिकल दुकानदारही सांगू शकत नाहीत, अशी स्थिती झाली आहे. तसेच ही इंजेक्‍शन्स महाग असल्याने दुकानदार एवढे पैसे गुंतवून याचा साठा करून ठेवणेही शक्‍य होत नाही.

पर्यायाने हे इंजेक्‍शन वेळेत उपलब्ध होत नसल्याचे दिसून आले आहे. या इंजेक्‍शनची किंमत सुमारे 27 हजार ते 40 हजारांपर्यंत आहे. त्यामुळे प्रत्येक रुग्णाच्या नातेवाईकाला ते परवडेलच असे नाही. हे जरी असले तरी रेमडेसिविर आणि “टॉसिलिझूमॅब’ आणि “अलझूमॅब’ ही इंजेक्‍शन्स मुळात करोनावरील मात्रा नाहीतच. पण, ते “अँटिबायोटिक’ असल्याने अन्य अवयवांवर याचा दुष्परिणाम होण्याची शक्‍यता आहे. शंभर बाधितांमागे 30 जणांना हे इंजेक्‍शन दिले जाते आणि त्यातील किमान 9 जणांना ते घातक ठरते,असे निरीक्षण आहे.

…फारसा उपयोग नाहीच
करोनाचा प्रादुर्भाव खूपच वाढला तर शरीरांतर्गत दाह वाढतो. त्याचा परिणाम अन्य अवयवांवर होतो. करोनाच्या पेशींची वाढ वेगाने होत असते. अशावेळी रुग्ण शॉकमध्ये जाऊन दगावू शकतो. त्यावर हे “टॉसिलीझूमॅब’ आणि “अलझूमॅब’ हे इंजेक्‍शन उपयोगी पडते. परंतु तेही योग प्रमाणात योग्य वेळी दिले, तरच त्याचा उपयोग होऊ शकतो. परंतु ही सगळी करोनावरील प्रमुख उपचाराचे इंजेक्‍शन्स आहेत, असे म्हणता येणार नाही, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

डॉक्‍टरांचाच सल्ला…
“तुमचा रुग्ण अत्यवस्थ आहे, ऑक्‍सिजन लेव्हल कमी झाली आहे. आता त्याला हे एकच इंजेक्‍शन वाचवू शकते’ असे सांगून “टॉसिलीझूमॅब’ आणि “अलझूमॅब’ हे इंजेक्‍शन डॉक्‍टर्स आता रुग्णांचा नातेवाईकांना आणायला सांगत आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.