पुणे – महाराष्ट्र वनविभाग आणि रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यातील कासव पुनर्वसन कार्यक्रमाने पहिल्या महिन्यातच उल्लेखनीय प्रगती केली आहे. सुटका केलेल्या कासवांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात पुनर्वसित करण्यासाठी विविध उपाय करण्यात आले आहेत. या पुनर्वसन केंद्रात ४१८ कासवांना आधीच दाखल केले आहे. त्यांना अलग ठेवणे, वैद्यकीय उपचार सुरू असून त्यांच्यात लक्षणीय प्रगती झाली आहे.
मुख्य वन्यजीव वॉर्डन विवेक खांडेकर, उपवनसंरक्षक तुषार चव्हाण यांच्या प्रयत्नाने आणि रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्टने घेतलेल्या काळजीतून हे शक्य झाले आहे. या प्रयत्नातून कासव हस्तांतरणासाठी व्यापक ऑनलाइन डेटा संकलन आणि लॉजिस्टिक नियोजन करण्यात आले आहे. विलगीकरण आणि पुनर्वसनासाठी सर्व कासवांची बावधन ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर, पुणे येथे यशस्वी वाहतूक करण्यात आली.
कासवांना बंदिवासातून वन्य आहार नमुन्यांमध्ये बदलणाऱ्या प्रजाती-विशिष्ट आहाराची अंमलबजावणी करण्यात आली. बाह्य परिस्थितीशी पर्यावरणीय अनुकूलता, त्यांचे आरोग्य आणि कल्याण सुनिश्चित करणे आदी गोष्टी करण्यात आल्या आहेत. हा कार्यक्रम महाराष्ट्राची समृद्ध जैवविविधता जतन करण्यासाठी आणि अवैध व्यापार आणि तस्करीपासून वाचवलेल्या वन्यजीवांप्रती आपली जबाबदारी निभावण्याची महाराष्ट्राची अतुलनीय बांधिलकी दर्शवतो. या प्राण्यांची केवळ सुटकाच नाही तर त्यांचे पुनर्वसनही सुनिश्चित करण्याच्या आमच्या समर्पणाचे हे स्पष्ट प्रदर्शन आहे.
वैज्ञानिक हस्तक्षेप आणि सहयोगी प्रयत्नांद्वारे वन्यजीव व्यापार आणि तस्करीच्या आव्हानांना तोंड देऊन, आम्ही या प्रजातींचे संरक्षण आणि भविष्यातील पिढ्यांसाठी पर्यावरणीय समतोल राखण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत आहोत, असे खांडेकर यांनी सांगितले.