कॉलेज बंद असल्यामुळे तालमींनाही मुहूर्त लागेना
पुणे – द्वितीय सत्र परीक्षांनंतर महाविद्यालयांच्या कलामंडळांना एकांकिका स्पर्धांचे वेध लागतात. जून, जुलैच्या सुरूवातीला स्पर्धांचे बिगुल वाजण्यास सुरूवात होते. मात्र, महाविद्यालये केव्हा सुरू होणार याबाबत साशंकता असल्याने यंदाच्या करंडक स्पर्धांचे आयोजनही लांबणीवर पडले आहे.
यंदा नवीन शैक्षणिक वर्ष सप्टेंबरच्या सुमारास सुरू होण्याची शक्यता आहे. त्यानंतर “पुरुषोत्तम’, “भरत’, “फिरोदिया’, “थेस्पो’ आदी करंडक स्पर्धांची रेलचेल सुरू होते. मात्र, यावर्षी करोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता करंडकांचे बिगुल केव्हा वाजणार असा प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनात आहे.
दरवर्षी महाविद्यालये सुरू झाल्यानंतर करंडकांसाठी होणारी निवड चाचणी, नियोजनासाठी बैठका आणि तालमींच्या श्रीगणेशाचा मुहूर्त लांबणीवर पडला आहे. यंदा कलामंडळांनी लॉकडाऊनचा फायदा करून घेत संहितांचे लेखन करणे, त्याचा अभ्यास करून, त्यावर चर्चा करणे आदी तयारीला सुरूवात झाली आहे. व्हिडिओ कॉल, व्हिडिओ मीटिंग ऍपचा उपयोग करून ही प्रक्रियेला सुरूवात झाली आहे.
“फिरोदिया’चा सोहळा रद्द; बक्षीस वितरण घरपोच
यंदाचा फिरोदिया करंडक स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा रद्द करण्यात आला आहे. मार्चमध्ये होणारा सोहळा करोनामुळे लांबणीवर पडला. पण, आता हा सोहळा रद्द केल्याचे आयोजकांकडून जाहीर करण्यात आले. करोनाची परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर सोहळ्याचे आयोजन करण्याचा विचार होता. मात्र, सद्यस्थिती पाहता पुढचे काही महिने सार्वजनिक कार्यक्रम आयोजन शक्य होणार नाही. फिरोदिया करंडक-2020 चा संपूर्ण निकाल सोशल मीडियाच्या माध्यमातून घोषित करण्यात येणार आहे. सर्व विजेत्यांची पारितोषिके, सन्मानचिन्ह महाविद्यालयांकडे पोहोचवण्यात येणार असल्याचे आयोजक अजिंक्य कुलकर्णी यांनी सांगितले.
यंदाच्या सिम्बॉयोसिस करंडकाबाबत लवकरच माहिती जाहीर करण्यात येणार आहे. स्पर्धांच्या आयोजनाबाबत महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाशी बोलणे सुरू आहे. महाविद्यालयाच्या मार्गदर्शन तत्वांनुसार स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे.
– मिहीर अमृतकर, कलामंडळ प्रमुख, सिम्बायोसिस महाविद्यालय
महाविद्यालये आणि नाट्यगृहे सुरू झाल्याशिवाय “पुरूषोत्तम करंडक’चे आयोजन करता येणार नाही. दरवर्षी गणेशोत्सवापूर्वी प्राथमिक फेरी होते. नेहमीच्या नियोजनानुसार, यंदा 5 ऑगस्टपर्यंत प्राथमिक फेरी सुरू करावी लागली असती. आगामी काळातील परिस्थिती पाहून पुढील निर्णय घेऊ.
– मंगेश शिंदे, विश्वस्त, महाराष्ट्रीय कलोपासक