कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पावसाने चांगलीच बॅटिंग केली आहे. गेल्या 24 तासात पंचगंगेच्या पाणीपातळीत 10 फुटांची वाढ झाली. जिल्ह्यात कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने 23 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. तर दिवसभरत राधानगरी धरणाच्या पाणीसाठ्यात 5 टक्क्यांची वाढ झाली असून धरण 77 टक्के भरलं आहे. पावसाचा जोर वाढल्याने 1 राज्यमार्ग तर 2 जिल्हा मार्ग बंद झाले असून पर्यायी मार्गाने वाहतूक सुरु आहे.
भारतीय हवामान खात्याने कोल्हापूर सह राज्यभरात मुसळधार पाऊस पडेल असं सांगितले होते. त्यानुसार कोल्हापूर जिल्ह्यात कालपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. विशेष म्हणजे पश्चिम घाट माथा असणाऱ्या गगनबावडा शाहूवाडी राधानगरी चंदगड आजरा या तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला आहे .आज सकाळपासून ही पावसाने आपला जोर कायम ठेवलेला आहे त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील भोगावती पंचगंगा सह सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे.
यंदाच्या पावसाळ्यात राजाराम बंधारा तिसर्यांदा पाण्याखाली गेला असून राजाराम सह 23 बंधारे आज पाण्याखाली गेले आहेत. जिल्ह्यातील राधानगरी, दूधगंगा, कासारी, कुंभी, घटप्रभा या धरण पाणलोट क्षेत्रामध्ये अतिवृष्टी सदृश्य पाऊस पडला असून धरणांच्या पाणी पातळीमध्ये कमालीची वाढ झाली आहे.
जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील तीन मार्ग बंद झाले असून त्यात एका राज्यमार्ग आणि दोन जिल्हा मार्गांचा समावेश आहे . मात्र पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू आहे. दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत असल्याने आणि नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.