पुणे – शहरात रविवारी सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यावर पाणी साचून हडपसर, येरवडा भागांतील घरात पाणी घुसले; तर 21 ठिकाणी झाडे कोसळण्याचे प्रकार घडले. निलायम टॉकीजजवळ एका कारसह दुचाकीवर मोठे झाड कोसळल्यामुळे दोघेजण जखमी झाले.
मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी रस्त्यावर पाणी साचले होते. तसेच, हडपसरमधील साडेसतरा नळी भागात ड्रेनेजचे पाणी घुसल्याचा प्रकार घडला. मार्केट यार्डमधील गेट क्र.1, रामवाडी भागातील ईशान्य मॉलजवळ तसेच येरवडा परिसरातील शास्त्रीनगर सोसायटी भागात घरामध्ये पाणी घुसले.
हडपसरमधील साडेसतरा नळी, सिरम कंपनी, गाडीतळ शिक्षक वसाहत, तुकाईमाता मंदिरासमोर, कौसरबाग, कोंढवा, ट्रेझर पार्क, वीर सावरकर सोसायटी, सहकारनगर येथे वाहनावर झाड कोसळले.
बिबवेवाडी-कोंढवा रस्ता, सिझन मॉलजवळ मगरपट्टा, नरपतगिरी चौक सोमवार पेठ, चतु:शृंगी मंदिराजवळ, सेनापती बापट रोड, निलायम टॉकीजजवळ फडके सभागृह चौक, सहजानगर सोसायटी, पुना हॉस्पिटलजवळ विसावा मारूती मंदिर, नवी पेठ, शनिवारवाडा समोर कसबा पेठ, आझादनगर वानवडी, अरण्येश्वर पार्क मंदिराजवळ, मनिषा सोसायटी, कर्वेनगर आदी भागांत झाडे कोसळण्याचे प्रकार घडले.