Accident News : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गवर पुन्हा एकदा भीषण अपघाताची घटना घडली आहे. वसई तालुक्यातील ससुपाडा परिसरात सहा वाहनांची एकमेकांना साखळी धडक होऊन मोठी दुर्घटना घडली. या अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली. मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात दोन कार, एक बस, टेम्पो, कंटेनर आणि एक पिकअप व्हॅन यांचा समावेश होता. धडक इतकी भीषण होती की सर्व वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. टेम्पोमधील चालक वाहनात अडकून पडला होता. स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी तत्परतेने मदत करत त्याला सुरक्षित बाहेर काढले. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. ‘ब्लॅक स्पॉट’ ठरतोय धोकादायक ससुपाडा परिसरात सुरू असलेले अपूर्ण रस्त्याचे काम आणि धोकादायक वळणे हीच या अपघाताची मुख्य कारणे असल्याचे सांगितले जात आहे. स्थानिकांच्या मते, हा परिसर ‘ब्लॅक स्पॉट’ बनला असून येथे वारंवार अपघात घडत आहेत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणवर संताप या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणावर संताप व्यक्त केला आहे. अनेक वेळा तक्रारी करूनही रस्त्याचे काम अपूर्णच ठेवण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. प्रशासनाकडून प्रवाशांना या मार्गावरून जाताना विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.