West Bengal Election: संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचे निकाल उद्या जाहीर होणार आहेत. त्या अगोदर विविध एक्झिट पोल्सनी भाजपला या निवडणुकीत विजय मिळेल असा अंदाज वर्तवला आहे. मात्र असे असले तरी तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी विजयाचा मोठा दावा केला आहे. ममता बॅनर्जी यांनी “आपण 200 पेक्षा जास्त जागा जिंकून पुन्हा सत्तेत येत आहोत, आश्वस्त राहा,” अशा शब्दांत आपल्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरला आहे. तसेच, मतमोजणी केंद्रांवर शेवटपर्यंत तैनात राहण्याचे कडक निर्देशही त्यांनी दिले आहेत. शेवटच्या मतापर्यंत लढण्याचे आदेश West Bengal Election: शनिवारी संध्याकाळी ममता बॅनर्जी यांनी राज्यभरातील मतमोजणी पर्यवेक्षक आणि पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची एक ‘व्हर्च्युअल मीटिंग’ घेतली. या बैठकीत त्यांनी, “आपण 200 पेक्षा जास्त जागा जिंकून पुन्हा सत्तेत येत आहोत, आश्वस्त रहा, सोपवलेली जबाबदारी चोख पार पाडा.. अखेरचा मत मोजला जात नाही, तोवर आपापली जागा सोडू नका,” असे स्पष्ट शब्दांत ममता बॅनर्जी यांनी टीएमसीच्या कार्यकर्त्यांना आदेश दिले आहेत. West Bengal Election: समोर आलेल्या माहितीनुसार, मतमोजणी प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर केंद्रीय अधिकाऱ्यांचा समावेश असल्यामुळे ममता बॅनर्जी काहीशा नाराज आहेत. मतमोजणीत कोणतीही गडबड होऊ नये किंवा संशयास्पद हालचाली होऊ नयेत, यासाठीच त्यांनी कार्यकर्त्यांना शेवटच्या क्षणापर्यंत डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. नेत्यांची वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये रवानगी West Bengal Election: दरम्यान, टीएमसी पक्षाने निकालासाठीची रणनीती आखली असून, यंदा विधानसभा निवडणूक न लढवणारे ज्येष्ठ पदाधिकारी आणि खासदारांवर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या नेत्यांना वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये निरीक्षक म्हणून आजच रवाना करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, तृणमूलच्या प्रदेश कार्यालयासमोर सध्या शांतता दिसत असली तरी, सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी आपापल्या नियुक्त जिल्ह्यांमध्ये आणि मतदान केंद्रांवर सज्ज झाले आहेत. उद्याच्या निकालात ममता बॅनर्जींचा हा 200 जागांचा दावा खरा ठरणार की एक्झिट पोलचे अंदाज खरे ठरणार, हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.