Tamil Nadu Politics: तमिळनाडूमध्ये अभिनेता-राजकारणी विजय यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन होण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. तमिळगा वेत्री कळघम (टीव्हीके) पक्षाने बहुमतासाठी आवश्यक संख्याबळ मिळविल्यानंतर विजय यांनी शनिवारी राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा सादर केला. सूत्रांच्या माहितीनुसार, विजय रविवारी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. तमिळनाडू विधानसभेतील 234 जागांपैकी सरकार स्थापनेसाठी 118 आमदारांचे संख्याबळ आवश्यक आहे. टीव्हीकेकडे 107 जागा असून काँग्रेसच्या 5 आमदारांसह भाकप, माकप, व्हीसीके आणि आययूएमएल या पक्षांच्या प्रत्येकी दोन आमदारांचा पाठिंबा मिळाल्याने विजय यांच्याकडे आता 120 आमदारांचे समर्थन जमा झाले आहे. शनिवारी विजय यांनी समर्थन देणाऱ्या पक्षांच्या नेत्यांसह राज्यपालांची भेट घेतली. यावेळी त्यांनी समर्थक आमदारांची पत्रे राज्यपालांकडे सुपूर्द केली. सरकार स्थापनेसाठी आवश्यक बहुमत असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला. ४ मे रोजी विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले होते. त्यावेळी टीव्हीकेला स्पष्ट बहुमतापासून 11 जागा कमी पडल्या होत्या. त्यानंतर विजय यांनी काँग्रेससह इतर पक्षांशी संपर्क साधून पाठिंबा मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले. ६ मे रोजी त्यांनी प्रथमच राज्यपालांची भेट घेतली होती; मात्र त्यावेळी आवश्यक संख्याबळ नसल्याने राज्यपालांनी समाधान व्यक्त केले नव्हते. दरम्यान, गेल्या काही दिवसांत विजय यांनी राज्यपालांची चार वेळा भेट घेतली. अखेर व्हीसीके आणि आययूएमएलनेही पाठिंबा जाहीर केल्यानंतर तमिळनाडूत विजय यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन होण्याचा मार्ग प्रशस्त झाला आहे.