1 शिंदे गटाचा दसरा मेळाव्यावरही दावा? | Top 10 News
दादरच्या शिवाजी पार्क मैदानात होणाऱ्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला दरवर्षी राज्यातील कानाकोपऱ्यातून शिवसैनिक उपस्थिती लावतात.. यंदा मात्र दसरा मेळावा वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला असून दसरा मेळावा एकनाथ शिंदे गटाचा होणार की उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा? याबाबत चर्चा सुरू आहे. मुंबई महापालिकेकडून मेळाव्याला परवानगी मिळावी यासाठी शिवसेनेने अर्ज दाखल केला अस्सल तरी महापालिकेने हात आखडता घेतल्याने शिवसेनेचा दसरा मेळावा शिंदे गट हायजॅक करणार का असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
2 दसरा मेळावा शिवसेनेचा असतो आणि शिवसेनेचाच राहणार – आदित्य ठाकरे
दसरा मेळाव्यावरून सुरु झालेल्या राजकारणावर शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ”दसरा मेळावा शिवसेनेचा असतो आणि शिवसेनेचाच राहणार.” असं आदित्य ठाकरे यांनी म्हंटल आहे. ‘शिवसेनेच्या दसरा मेळाव्याच्या परवानगी आम्ही सतत प्रयत्न करतो मात्र अद्याप परवानगी मिळाली नाही’ अशी माहिती देताना ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर दडपशाहीचे आरोप केले.
3 दसरा मेळाव्यावर उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणतात, ‘जे नियमात आहे ते होईल’ | Top 10 News
शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरून राजकीय वातावरण तापले असतानाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत बोलताना, ‘जे नियमात आहे ते होईल. नियमाच्याबाहेर जाऊन या सरकारमध्ये काहीच होणार नाही,’ असं सांगितलं आहे. एकनाथ शिंदे वा उद्धव ठाकरे हे मेळावा घेणार आहेत की नाहीत याबाबत कल्पना नसल्याचेही फडणवीस यावेळी बोलताना म्हणाले.
4 मंत्री भुमरेंच्या उपस्थितीतील कार्यक्रमात खुर्च्या रिकाम्या
मंत्री संदीपान भुमरे यांच्या उपस्थितीत पैठण येथे पार पडलेल्या एका कार्यक्रमाची चर्चा राज्यभरात रंगली आहे. या कार्यक्रमाला मंत्रिमहोदयांनी उपस्थिती असताना देखील कार्यकर्त्यांनी पाठ फिरवल्याने खुर्च्या रिकाम्याच राहिल्याचे पाहायला मिळाले. काही दिवसांपूर्वी पैठण येथे आदित्य ठाकरेंच्या सभेला अफाट गर्दी जमली होती, भुमरे उपस्थित असलेल्या कार्यक्रमात मात्र खुर्च्या रिकाम्या राहिल्याने उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे.
5 ‘विनाशकाले विपरीत बुद्धी’ – शिवसेना – संभाजी ब्रिगेड युतीवर फडणवीसांची खोचक टीका | Top 10 News
उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी शिवसेना – संभाजी ब्रिगेड युतीची घोषणा केली. यावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खोचक टिका केली आहे. नागपूर येथे पत्रकारांनी फडणवीस यांना शिवसेना-संभाजी ब्रिगेड युतीबाबत विचारले असता त्यांनी, ‘मी यावर एवढंच म्हणेन की विनाशकाले विपरीत बुद्धी’ अशी खोचक टीका केली.
6 उद्धव ठाकरेंमध्ये दम नाही म्हणणाऱ्या नवनीत राणांवर सुषमा अंधारेंचा पलटवार
शिवसेना – संभाजी ब्रिगेडच्या युतीवर भाष्य करताना खासदार नवनीत राणा यांनी,” ठाकरे यांच्यात संभाजी ब्रिगेडचे काम जोरदार आहे. त्यांना उभा महाराष्ट्र जाणतो. पण उद्भव ठाकरे यांच्यात दम नाही” अशी टीका केली होती. राणा यांच्या टीकेवर आता शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी पलटवार केला आहे. “आपला मतदारसंघ सोडून दारोदार हनुमान चालिसा म्हणत फिरण्यापेक्षा एकाच ठिकाणी राहून संपूर्ण राज्याला कोरोनासारख्या महामारीतून वाचवणे हे जास्त पुण्याचे काम आहे आणि ते उद्धव साहेबांनी चोखपणे पार पाडलेय.” असं अंधारे यांनी म्हटलंय.
7 राजकीय पक्षांना अज्ञात स्त्रोतांकडून मिळाले 15 हजार कोटी | Top 10 News
राजकीय पक्षांना दिल्या जाणाऱ्या देणग्यांबाबत नेहमीच चर्चा होत असतात. त्यातच आता असोसिएशन फॉर डेमोक्रॅटीक रिफॉर्म्स अर्थात एडिआर या संस्थेने या देणग्यांबाबतचा एक अहवाल सादर केला आहे. त्यात राजकीय पक्षांना अज्ञात स्त्रोतांकडून 15,077 कोटी रूपये मिळाले आहेत. एडिआरच्या म्हणण्यानुसार अज्ञात स्त्रोतांकडून देणग्या मिळण्यामध्ये कॉंग्रेस पक्ष आघाडीवर असून पक्षाला 178 कोटी रूपये मिळाले आहेत. तर भाजपला अज्ञात स्रोतांकडून १०० कोटी मिळाल्याचं एडिआरने म्हटलंय.
8 सोनाली फोगट हत्या प्रकरण : हॉटेल मालक व मादकद्रव्य विक्रेत्यास पोलिसांनी घेतले ताब्यात
गोवा पोलिसांनी शनिवारी उत्तर गोव्यातील रेस्टॉरंट मालक आणि एका संशयित मादकद्रव्य विक्रेत्याला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात या आधीच दोन जणांना अटक करण्यात आली असून मादकद्रव्य विक्रेत्यानेच या दोन आरोपींना मादकद्रव्यांचा पुरवठा केला असावा, असा पोलिसांचा दावा आहे. दत्तप्रसाद गावकर असे या मादकद्रव्य तस्काराचे नाव आहे. दोघा आरोपींनी त्यांच्या कबुलीजबाबात गावकर याच्याकडूनच अमली पदार्थ आणल्याची कबुली दिली होती, असे पोलिसांनी सांगितले.
9. रशिया युद्ध थांबवणार नाही | Top 10 News
युक्रेनने जरी नाटोमध्ये सामील होण्याची आपली महत्वाकांक्षा सोडून दिली तरी रशिया आता युद्ध थांबवणार नाही, असे रशियाचे विद्यमान अध्यक्ष पुतीन यांचे निकटवर्तीय आणि माजी अध्यक्ष दिमित्री मेडवेदेव यांनी म्हटले आहे. मेडवेदेव हे रशियाच्या संरक्षण परिषदेचे उपप्रमुख आहेत. फ्रान्सच्या वृत्तवाहिनीला दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी रशियाची भुमिका स्पष्ट केली आहे. युक्रेनचे अध्यक्ष वोलोदायमिर झेलेन्सकी यांच्याबरोबर काही अटी आणि शर्तींच्या आधारे चर्चेला रशिया तयार आहे. त्या दृष्टीने रशियाची चाचपणीही सुरू असल्याचेही मेडवेदेव यांनी सांगितले.
10. अंडर – 17 विश्वचषकाचे यजमानपद भारताकडे कायम
फिफाने उठवली एआयएफएफवरील बंदी
आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघ अर्थात फिफाने अखिल भारतीय फुटबॉल महासंघावर (एआयएफएफ) घातलेली बंदी नुकतीच तातडीने उठविली आहे. सर्वोच्च न्यायालयाने प्रशासक समिती नेमण्याचा आदेश रद्द केल्यानंतर फिफाने बंदीचा निर्णय मागे घेतला आहे. यामुळे अंडर-17 महिला विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद भूषवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याबाबत इंडियन फुटबॉलने त्यांच्या अधिकृत ट्विटरवरून माहिती दिली.