शहर आजाराच्या विळख्यात

पिंपरी – गेल्या पंधरा दिवसांपासून शहरातील विविध भागांमध्ये विशेषत: जिथे पूर येऊन गेला आहे, तिथे रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. महापालिकेच्या दवाखान्यांसोबतच खासगी दवाखान्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्णांची गर्दी दिसून येत आहे. एरव्ही दुपारी बारा वाजता बंद होणाऱ्या खासगी दवाखान्यांतध्ये सध्या दुपारी दोन ते तीन वाजेपर्यंत डॉक्‍टर रुग्णांना तपासताना दिसून येत आहे.

त्याचप्रमाणे रात्री देखील उशिरापर्यंत रुग्णांची रांग दवाखान्यांमध्ये दिसून येत आहे. जानेवारीपासून आतापर्यंत शहरात 67 रुग्णांना डेंग्यूची लागण झाली आहे, त्यापैकी 30 रुग्ण हे ऑगस्ट महिन्यातील आहेत. पिंपरी-चिंचवड शहरातील अनेक भागांमध्ये 4 ऑगस्ट रोजी पूर आला होता. दोन दिवस शहरात पुराने थैमान घातले होते. त्यानंतर जनजीवन सुरळीत होण्यास एक आठवड्याहून अधिक काळ उलटून गेला, परंतु अद्यापही घरांच्या इमारतींच्या भिंती अद्यापही सुकल्या नाहीत.

भिंतीवर आलेला ओलावा आणि कुबट वास, परिसरातील अस्वच्छता यामुळे साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. त्यातच सातत्याने हवामानात होत असलेले बदल देखील आजारांच्या पथ्यावर पडत आहेत. गेल्या पंधरा दिवसांपासून आजाराचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. रविवारी देखील उपनगरांमध्ये दवाखाने सुरू असल्याचे गेल्या दोन आठवड्यांपासून दिसून आले आहे.

ऑगस्ट महिन्यात आत्तापर्यंत डेंग्यूची लागण झालेले 30 रूग्ण आढळले आहेत. रूग्णांची वाढती संख्या पाहता महापालिका वैद्यकीय विभाग त्याबाबत पुरेशा उपाययोजना करण्यात अपयशी ठरत असल्याचे चित्र समोर येत आहे. जानेवारी महिन्यापासूनच डेंग्यूचे संशयित रूग्ण आढळण्यास सुरवात झाली. संशयित रूग्ण आढळत असले तरी मे महिन्यापर्यंत डेंग्यूची लागण झालेले रूग्ण सापडले नव्हते.

जून महिन्यापासून डेंग्यूची लागण झालेल्या रूग्ण आढळू लागले. जून महिन्यामध्ये 9 रूग्ण तर, जुलैमध्ये त्याच्या तिप्पट म्हणजे 28 रूग्णांना डेंगू झाल्याचे निष्पन्न झाले. तर, ऑगस्टमध्ये 19 तारखेपर्यंतच 30 रूग्ण आढळले आहेत. जानेवारी महिन्यापासून आत्तापर्यंत 469 संशयित रूग्ण आढळले. त्यातील प्रत्यक्ष 67 जणांना लागण झाली आहे. यामुळे प्रतिबंधात्मक उपायांची गरज भासत आहे.

स्वच्छता अत्यावश्‍यक

पूरग्रस्त भागातील भिंती अद्यापही सुकल्या नाहीत कारण दोन घरांमध्ये आणि इमारतींमध्ये खूपच कमी अंतर आहे. त्यात गेल्या काही दिवसांमध्ये सूर्यप्रकाश क्‍वचितच दिसून आला. यामुळे ओल सुकत नाही. तसेच नागरिकांनी घरातील भिजलेले कपडे व कुजलेले सामान बाहेर आणून टाकले. यामुळे मोठ्या प्रमाणात आजार पसरत आहेत. मोठ्या प्रमाणात जनजागृती होऊनही लोक उघड्यावर कचरा टाकत आहेत.

आरोग्यासाठी घातक ठरणारे कचऱ्यातील जंतूू हवेद्वारे नागरिकांपर्यंत पोहचत आहेत. तसेच कुठेही थुंकण्यामुळे, वापरलेले डायपर, वैगेरे उघड्यावर टाकणे यामुळे देखील आजार बळावत असल्याचे डॉक्‍टरांचे स्पष्ट मत आहे. यामुळे प्रशासनासोबत नागरिकांनी देखील स्वच्छतेची काळजी घेणे अत्यावश्‍यक आहे. तसेच शहरात सध्या डासांचा प्रादुर्भावही वाढला आहे, डासोत्पत्ती होऊ नये, याची देखील प्रशासनासोबतच नागरिकांनीही काळजी घेणे गरजेचे आहे.

 

गेल्या दोन आठवड्यांपासून रुग्णांचे प्रमाण वाढले आणि सातत्याने वाढतच आहे. हवामानातील बदलांमुळे तसेच उघड्यावर टाकण्यात येणारा कचरा, अस्वच्छता यामुळे आजार वाढत आहेत. नागरिकांनी स्वच्छतेची विशेष काळजी घ्यावी. तसेच दूषित पाण्यामुळे देखील आजार वाढत असल्याने पाणी उकळून प्यावे.

– डॉ. अनिल पाटील, सांगवी

शहरात डेंगीची रूग्ण वाढले आहेत. त्यामुळे याबाबत वैद्यकिय अधिकाऱ्यांसमवेत बैठका घेऊन उपाययोजना केल्या जात आहेत. डासांमुळे होणाऱ्या साथीच्या आजारांचे प्रमाण जास्त असल्याने डास नियंत्रणासाठी काय करता येईल, त्या दृष्टीने आवश्‍यक कार्यवाही सुरू आहे.

– डॉ. पवन साळवे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकिय अधिकारी.

Leave A Reply

Your email address will not be published.