नगराध्यक्षांची आता कामाला सुरुवात
नगराध्यक्ष माधवी कदम यांना मागील अडीच वर्षात आघाडीतल्या धुरिणांशी जमवून घेताना प्रचंड त्रास झाला. जाच कामाचा नव्हता तर गटबाजीच्या राजकारणाचा होता. त्यामुळे नगराध्यक्षांना आपल्या अधिकारांचा वापरच करता आला नव्हता. किशोर शिंदे उपनगराध्यक्ष झाल्यापासून आघाडीच्या व पालिकेच्या कामाची गती वाढली आहे. शाहू कला मंदिराच्या नूतनीकरणामध्ये लक्ष घालून नगराध्यक्षांनी आता विकासकामांचा नारळ फोडला आहे.
सातारा – साताऱ्याच्या रंगकर्मींचे हक्काचे स्थान असलेल्या आणि व्यावसायिक नाटकांची पहिली पसंती असलेल्या शाहू कला मंदिराची तिसरी घंटा आता दीड महिन्यानंतर वाजणार आहे. वेगवेगळ्या फंडातून आणि नगराध्यक्षांच्या कोट्यातून साधारणपणे एक कोटी रुपये खर्च करून शाहू कला मंदिर नव्या स्वरूपात सातारकरांच्या सेवेत हजर होणार आहे.
बंदिस्त नाट्यगृह झाल्यानंतर तब्बल चार दशके सातारकरांना दर्जेदार नाट्यप्रयोगांची अनुभूती देणारे आणि सातारा शहरच नव्हे तर जिल्ह्यातील हौशी रंगकर्मीचे हक्काचे स्थान असलेले शाहू कला मंदिर तेथे होणाऱ्या नाटकांपेक्षा अनेक उणिवांमुळे नेहमीच चर्चेत असते.
कधी ध्वनी यंत्रणेचा दोष तर कधी सदोष आसनव्यवस्था, मोडकळीस आलेला रंगमंच तर कधी मेकअप रूमची दुरवस्था तर अलीकडे नूतनीकरणानंतर वातानुकूलन यंत्रणेत वारंवार होणारे बिघाड, अशा या ना त्या कारणाने शाहू कला मंदिराविषयी रंगकर्मी व नाट्यरसिक सातत्याने ओरड करत असतात. 2009 मध्ये दोन्ही राजांच्या मनोमीलनाच्या काळात वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून दोन कोटी रुपये खर्चून या नाट्यगृहाचे नूतनीकरण करण्यात आले. या नूतनीकरणाची राजकीय चर्चा आणि त्यानिमित्ताने झालेल्या कुरघोड्यासुद्धा सातारकरांनी अनुभवल्या होत्या.
तेव्हापासून दशकभराच्या सेवेनंतर शाहू कला मंदिर पुन्हा नूतनीकरणाच्या निमित्ताने दीड महिना बंद राहणार आहे. गणेशोत्सव व नवरात्रोत्सवात छोट्यामोठ्या कार्यक्रमांसाठी शाहू कला मंदिराला सातत्याने मागणी असते. यंदा ही मागणी पूर्ण होऊ शकणार नाही. वैशिष्ट्यपूर्ण अनुदान, सर्वसामान्य निधी अनुशेष, स्थायी समितीचा निधी व नगराध्यक्ष फंड अशा वेगवेगळ्या शीर्ष अंर्तगत 60+40, असा एक कोटी रुपये खर्च नूतनीकरणासाठी केला जाणार आहे.
यामध्ये ध्वनी यंत्रणेची परिणामकारकता वाढवणारे तंत्रज्ञान वापरले जाणार आहे. मोडकळीस आलेल्या रंगमंचाचे नूतनीकरण, शौचालयांची दुरुस्ती, भिंतीतील गळती कायमस्वरूपी काढणे, अशी कामे केली जाणार आहेत. मेकअप रूमचे अद्ययावतीकरण, प्रवेशद्वारांची रंगरंगोटी, दर्शनी मोकळ्या भागात पेव्हर ब्लॉक्स व हौशी नाट्य चळवळीसाठी छोटे कलादालन, आटोपशीर जागेत उपहारगृह अशा सुविधा रंगकर्मी व नाट्यरसिकांना दिल्या जाणार आहेत. नूतनीकरणामुळे शाहू कला मंदिर 26 ऑगस्टपासून बंद राहणार असल्याचे व्यवस्थापक विश्वास गोसावी यांनी सांगितले.