उपक्रमशील सोसायट्या
पिंपरी – वाकड येथील सफायर पार्क सोसायटीचा परिसर हा निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे. येथे तीनशे मोठे वृक्ष तर, एक हजार छोटे व मध्यम आकाराचे वृक्ष आहेत. गांडूळखत, खत निर्मिती प्रकल्पाद्वारे सोसायटीतील कचऱ्यावर प्रक्रिया केली जात आहे. त्याचबरोबर, दररोज निर्माण होणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्या पाण्याचा बागेसाठी आणि फ्लशसाठी पुर्नवापर केला जात आहे. अशा विविध पर्यावरणपूरक उपक्रमांमुळे सोसायटीने आपले वेगळेपण निर्माण केले आहे.
सफायर पार्क सोसायटी ही 12.5 एकर क्षेत्रात वसलेली आहे. त्यामध्ये एकूण 624 सदनिका आहेत. निसर्गसौंदर्याने नटलेल्या या सोसायटीमध्ये सिताफळ, पेरू, आंबा, डाळिंब, मोसंबी, केळी ही फळझाडे आहेत. तर, शिरीष, गुलमोहर, बहावा, निलपुष्प आदी वृक्ष आहेत. तसेच, पारिजातक, रातराणी, जास्वंद, मोगरा, टूलिप्स, शेवंती आदी फुलझाडे देखील पाहण्यास मिळतात.
सोसायटीमध्ये दर वर्षी जेष्ठ व्यक्तींच्या हस्ते वृक्ष लागवड केली जाते. सोसायटीत गेल्या आठ वर्षांपासून गांडूळखत प्रकल्प सुरू आहे. 2 ऑक्टोबर 2018 पासून सोसायटीत ओला आणि सुका कचऱ्याचे वर्गीकरण केले जात आहे. सोसायटीमध्ये खत निर्मिती प्रकल्प देखील सुरू आहे. त्या माध्यमातून तयार झालेले खत बागेसाठी वापरले जाते.
सोसायटीत 2012 पासून सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प कार्यरत आहे. या प्रकल्पातून पुर्नप्रक्रिया केलेले पाणी बागेला आणि शौचालयातील फ्लशला वापरले जाते. सोसायटीमध्ये प्रति दिन 70 ते 80 हजार लिटर पाण्याचा जलशुद्धीकरण प्रकल्प कार्यान्वित आहे. या माध्यमातून बोअरवेलच्या पाण्याचा हार्डनेस कमी करून ते पाणी घरगुती कामासाठी वापरले जाते, अशी माहिती सोसायटीचे अध्यक्ष सचिन साळवी, सरचिटणीस पराग तांबे यांनी दिली.
सौरऊर्जा प्रकल्पाचे नियोजन
सोसायटीमध्ये 60 किलोवॅट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पाची कार्यक्षमता वाढविण्यासाठी काही आधुनिक उपकरणे देखील बसविली जाणार आहेत. सौरऊर्जेचा वापर सुरू झाल्यानंतर 25 टक्के वीजेची बचत होणार आहे. सोसायटीत जलपुनर्भरण प्रकल्प (रेन वॉटर हार्वेस्टिंग) उभारण्याचे देखील नियोजन आहे. संबंधित प्रकल्पामुळे जमिनीखालील पाण्याची पातळी वाढणार आहे.
रहिवाशांचा उत्स्फूर्त सहभाग
सोसायटीमध्ये दिवाळी, गणेशोत्सव, होळी, दहीहंडी, दसरा, रक्षाबंधन आदी सण मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. त्यामध्ये रहिवाशी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतात. सोसायटीच्या आवारात मान्यवर वक्त्यांची व्याख्याने, नृत्य कार्यशाळा असे विविध कार्यक्रम होतात. सोसायटीमध्ये मैदानी खेळ, फुटबॉल, बॅडमिंटन, टेबल टेनीस, लॉन टेनीस, बिलीयर्ड, कॅरम आदी खेळांच्या वार्षिक क्रीडा स्पर्धा घेतल्या जातात. जलतरण तलाव, व्यायामासाठी जिम, योगाभ्यास आदी सुविधा येथे उपलब्ध आहेत