कोतवाली पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल
नगर – पोलिसात जबाब दिल्याच्या रागातून तरूणाच्या भावाच्या अंगावर बुलेट घालून त्यास गंभीर जखमी केले. उपचारादरम्यान या जखमीचा पुण्यातील ससून रुग्णालयात मृत्यू झाला. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात संजय पाचरणे (रा. बुरूडगाव, ता. नगर) याच्याविरुद्ध खुनाचे कलम वाढविण्यात आले आहे.
याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, दीपक केदारे याने संजय पाचरणे याच्या विरूद्ध जबाबत दिला होता. या रागातून 12 ऑगस्ट रोजी दुपारी संजय पाचरणे याने दीपक केदारे यांचा भाऊ समाज केदारे यांच्या उजव्या पायावर बुलेट गाडी घातली.
“तुझा भाऊ दीपक याला सांग की माझ्याविरोधात दिलेला जबाब मागे घे. नाहीतर तुला जिवे मारून टाकीन’, अशी धमकी देऊन त्याला मारहाण केली होती. या मारहाणीत समाज केदारे हा गंभीर जखमी झाला होता. त्यामुळे त्याला पुण्यातील ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्याचा आज (दि.23) रोजी सकाळी मृत्यू झाला. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात दीपक केदारे यांच्या फिर्यादीवरून संजय पाचारणे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.