संगमनेर येथील गणेश मूर्तींना शेजारच्या जिल्ह्यातून मोठी मागणी
संगमनेर – लाडक्या गणरायाचे आगमन अवघ्या आठ दिवसांवर आल्याने गणपती कारखान्यांमध्ये गणेशमूर्ती विकण्याची लगबग सुरू झाली आहे. जीएसटीमुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मूर्तीची किंमत 10 ते 15 टक्क्यांनी वाढली आहे. संगमनेर येथून पुणे, मुंबई, अहमदनगर, नाशिक, पनवेल अशा दुसऱ्या जिल्ह्यातही मूर्ती पाठवण्यात येतात.
संगमनेर शहरामध्ये गेल्या काही वर्षात गणेशमूर्ती घडविणाऱ्या कारखान्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सध्याच्या स्थितीमध्ये शहरासह वाघापूर येथे मोठा कारखाना असल्याने येथील गणपती मूर्तींची मागणी मोठ्या प्रमाणात असते. या कारखान्यांमध्ये साधारण नोव्हेंबर – डिसेंबर महिन्यापासूनच गणेशमूर्ती तयार करण्याचे काम सुरू होते. जुलै महिन्यापर्यंत गणेशमूर्ती तयार करण्याचे काम हे जवळपास 80 टक्के पूर्ण झाले असते.
यंदाच्या वर्षी 10 ते 15 टक्क्यांनी मूर्तींची किंमत वाढली असल्याचे संदीप जोर्वेकर यांनी सांगितले. गणेशमूर्ती तयार झाल्यानंतर त्यावर धूळ बसू नये, तसेच तिचे पावसापासून संरक्षण व्हावे, यासाठी तिला प्लास्टिकचे आवरण घातले जाते. तसेच पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे प्लॅस्टिकशिवाय दुसऱ्या शहरामध्ये मूर्ती पाठवणे देखील अवघड होते.
यंदा मात्र प्लॅस्टिक बंदी असल्यामुळे सहजासहजी मूर्तीच्या आकाराप्रमाणे प्लास्टिकच्या पिशव्या उपलब्ध होत नसल्याने अडचणी वाढल्या आहेत. संगमनेर येथील गणेशमूर्ती या संगमनेर तालुका व जिल्ह्यासह राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पाठवण्यात येतात. यंदा गणेशमूर्तींना गुजरात, कर्नाटक या राज्यांमधूनही चांगली मागणी असून या दोन्ही राज्यांमध्ये मूर्ती पाठवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
डिसेंबरपासून आम्ही गणेशमूर्ती तयार करण्याचे काम सुरू करतो. सहा इंचापासून पंधरा फुटापर्यंत गणेशमूर्ती सध्या उपलब्ध आहेत. मोठ्या आकारातील मूर्तींमध्ये वसईचा राजा, चिंतामणी गणेश, लालबागचा राजा, शारदा गणेश, अशा मूर्तींची मागणी वाढली असून लालबागचा राजा, दगडूशेठ हलवाई, पोट्या गणेश, लोड सावकार, जास्वंद बैठक, कमळ गणेश, गोलगादी बैठक, बाळ गणेश चौरंग, कासव बैठक, मोर फेटा, दगडू सिंहासन, दागिना अशा विविध प्रकारच्या मूर्ती बनविण्यात येतात.
संदीप जोर्वेकर मूर्तिकार