निमगाव म्हाळुंगीत जमीन व्यवहारात फसवणूक

शिक्रापूर – टाकळी भीमा (ता. शिरूर) येथे काही दिवसांपूर्वी एका प्रतिष्ठीत व्यक्तीवर जमिनीच्या फसवणुकीबाबत गुन्हा दाखल झालेला असताना आता पुन्हा या भागात जमिनीच्या व्यवहारातून चार लोकांची लाखो रुपयांची फसवणूक केली असल्याची घटना घडली आहे.

याप्रकरणी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. योगीराज डेव्हलपर्सचे संचालक राहुल शंकर करपे (रा. टाकळी भीमा, ता. शिरूर) व अभिजित कोठावळे (रा. मलठण ता. शिरूर) अशी गुन्हा दाखल त्तलेल्यांची नावे आहेत. तर रोहिदास बाजीराव शिवले, पुंडलिक सबाजी दंडवते (दोघे रा. शिवतक्रार म्हाळुंगी, ता. शिरूर), सुखदेव पांडुरंग घोलप (रा. घोलपवाडी, ता. शिरूर) व संतोष ज्ञानोबा आफळे (रा. उरळगार्वें ता. शिरूर) यांची या प्रकरणात फसवणूक झाली आहे. यातील राहिदास शिवले यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

याबाबतची माहिती अशी- टाकळी भीमा येथील राहुल करपे यांच्या मालकीच्या योगीराज डेव्हलपर्सकडे निमगाव म्हाळुंगी (ता. शिरूर) येथील काही जमीन विक्रीस असल्याने रोहिदास शिवले, पुंडलिक दंडवते, सुखदेव घोलप व संतोष आफळे या चौघांनी मिळून योगीराज डेव्हलपर्सच्या वतीने राहुल करपे यांच्याकडून काही मित्रांच्या समक्ष ही जमीन 23 लाख रुपयांना विकत घेण्याबाबत तोंडी व्यवहार 2011 साली केला होता.

जमीन घेणाऱ्या चौघांपैकी रोहिदास शिवले यांनी राहुल करपे यांच्या सणसवाडी येथील कार्यालयात वेळोवेळी जाऊन दहा लाख रुपये दिले, तर सुखदेव घोलप यांनी देखील रोख व चेक स्वरूपात सहा लाख रुपये राहुल करपे यांना त्यांच्या कार्यालयात वेळोवेळी जाऊन दिले. संतोष आफळे यांनी देखील राहुल करपे यांना त्यांच्या कार्यालयात वेळोवेळी जाऊन पाच लाख रुपये दिले आणि पुंडलिक दंडवते यांनी देखील करपे यांना दोन लाख रुपये रोख दिले.

जमीन खरेदीसाठी ठरलेले तेवीस लाख रुपये सन 2011 मध्येच योगीराज डेव्हलपर्सच्या वतीने राहुल करपे व त्यांच्या कार्यालयातील कामकाज पाहणाऱ्या अभिजित कोठावळे यांच्याकडे दिलेले आहे. यानंतर जमीन घेणारे चौघेजण करपे यांच्याकडे या जमिनीचे खरेदीखत करून देण्याची विनंती करत असताना करपे हे नंतर खरेदीखत करून देतो, असे म्हणून टाळाटाळ करत होते. आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्याने रोहिदास शिवले यांनी फिर्याद दिली.

पैसे घेऊन जमीन भलत्यालाच विकली

ही जमीन 2014 साली वाघोली येथील संजय सातव यांना विक्री केली असल्याची माहिती चौघांना मिळाली. पुंडलिक दंडवते यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फसवणूक झाल्याबाबत अर्ज केला होता. यानंतर करपे यांनी या चौघांना देखील मी तुम्हाला दुसरी जमीन देतो आणि तुम्हाला दुसरी जमीन नाही आवडली तर तुमचे पैसे परत देतो थोडे थांबा, अशी विनंती केली; परंतु अद्यापपर्यंत जमीन खरेदी करणाऱ्यांना त्यांचे पैसे परत दिले नाहीत.

Leave A Reply

Your email address will not be published.