सातारा हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात

“हर हर महादेव’च्या जयघोषात धावले हजारो स्पर्धक

सातारा – सातारा रनर्स फाउंडेशनच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या आठव्या हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धेत देशविदेशातील साडेआठ हजारांहून अधिक स्पर्धक धावले. निसर्गाचा हिरवागार शालू अंगावर पांघरलेल्या यवतेश्‍वरचा नागमोडी घाटाच्या चढणीसह 21 किमीचे अंतर धावपटूंनी “हर हर महादेव’च्या जयघोषात पार केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरवर्षीप्रमाणे यंदाही इथिओपिया आणि केनियाच्या धावपटूंनी या मॅरेथॉनवर वर्चस्व गाजवले. पोलीस कवायत मैदान ते प्रकृती हेल्थ रिसॉर्ट, गणेश खिंड पठार व पुन्हा सातारा पोलीस परेड मैदान अशी ही 21 किमी अंतराची जागतिक स्तरावर प्रसिद्ध असलेली आणि सर्वात कठीण असलेली लांब पल्ल्याची शर्यत रविवारी जोशात पार पडली.

मॅरेथॉनला सकाळी सव्वासहा वाजता खा. उदयनराजे भोसले, माजी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या हस्ते झेंडा दाखवून आणि रनर्स फाउंडेशनच्या पदाधिकारी व सदस्यांच्या उपस्थितीत प्रारंभ झाला. शर्यतीच्या मार्गात स्पर्धकांना कोणताही अडथळा निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा पोलीस दलाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या मार्गावरील संपूर्ण वाहतूक सकाळी 11 वाजेपर्यंत बंद करण्यात आली होती. स्पर्धकांना आरोग्यविषयक सेवासुविधा पुरवण्यासाठी जागोजागी रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आल्या होत्या.

स्पर्धा सुरू होण्यापूर्वी फटाक्‍यांची जोरदार आतषबाजी करण्यात आली. स्पर्धकांचा उत्साह वाढवण्यासाठी शहरातील नागरिकांनी शर्यतीच्या मार्गावर दुतर्फा गर्दी केली होती. त्यांनी दिलेल्या “जय भवानी, जय शिवाजी’, “हर हर महादेव’, “गणपतीबाप्पा मोरया’, “कमॉन फास्ट’ या घोषणांनी स्पर्धकांचा जोश व जोम अधिक वाढत होता. या सोबतीला ढोल व लेझीम पथकांनीही स्पर्धकांचा उत्साह वाढवला. स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच इथोपिया, केनिया या परदेशी खेळाडूंनी आघाडी घेतली होती. घाटरस्त्यात दमछाक होत असली तरी उत्साह तसूभरही कमी झाला नाही.

स्पर्धकांच्या सेवेसाठी
सातारा हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धेसाठी केवळ तालुका, जिल्हा, राज्य, देश नव्हे तर परदेशातूनही स्पर्धक येत असतात. या स्पर्धकांची स्पर्धेवेळी कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी आयोजकांकडून सर्व गोष्टी केल्या जातातच. परंतु, सातारकरही या स्पर्धकांना काही कमी पडू नये यासाठी झटत असतात. रविवारी स्पर्धेवेळी सातारकांनी स्पर्धा मार्गावर स्पर्धकांसाठी पाण्यासह इतरही गोष्टींची अशाप्रकारे सोय केली होती.

धावपटू साताऱ्याच्या प्रेमात
नागमोडी वळणं घेत जाणारा घाटमार्ग, छोटे धबधबे, चोहीकडे दाटलेली श्रावणातील हिरवळ, शुद्ध हवा, सातारकरांचे आदरातिथ्य या सर्वांच्यामागे खंबीरपणे उभा असलेला स्थितप्रज्ञ अजिंक्‍यतारा अशा निसर्गरम्य वातावरणाच्या मोहात धावपटू पडले नाही तरच नवल! याची अनुभूती या मॅरेथॉनच्या निमित्ताने आली.

आज मुंबई व हैद्राबाद येथेही मॅरेथॉन होत आहेत. तरीही बहुतांश धावपटूंनी साताऱ्याला पसंती दर्शवली. सातारा जिल्ह्यातील सुमारे 2 हजार धावपटूंचा स्पर्धेत सहभाग असला तरी तब्बल 6 हजार 500 धावपटू देशविदेशातून साताऱ्यात आले होते. पुढील वर्षीही जरुर येणार असा निर्धार करुनच या पाहुण्यांनी साताऱ्याचा निरोप घेतला.

स्पर्धकांसाठी सातारकरांकडून शॉवर
धावल्यामुळे घामाघूम झालेल्या स्पर्धेकांना थंड करण्यासाठी सातारकरांकडून रस्त्यावर शॉवरद्वारे पाण्याचे फवारे स्पर्धकांच्या अंगावर उडविले जात होते. विशेष म्हणजे स्पर्धेच्या मार्गावर असलेल्या घाटातून वाहणाऱ्या झऱ्यांचे पाणी तोंडावर मारून घेऊन अनेक स्पर्धक पुढचा पल्ला गाठत होते तर काही स्पर्धकांनी या मार्गावर असलेल्या छोट्या धबधब्यांखाली चिंब भिजण्याचा आनंद घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)