कमी दरामुळे यंदाही “आलं’ शेतकऱ्यांना रडवणार

हेळगाव  – शेतकऱ्यांनी आलं पिकासाठी केलेली मेहनत, घातलेला खर्च व मिळणारे उत्पन्न याचा विचार केला तर यावर्षी आलं हे पीक शेतकऱ्यांना रडवणार अशी चिन्हे दिसत आहेत. सध्याचा दर सुद्धा कमी झाल्याने त्याचाही परिणाम यावर होण्याची शक्‍यता आहे.

यामुळे सर्व शेतकरी चिंताग्रस्त असून इतर पिकाबरोबरच या पिकाला देखील खर्चाप्रमाणे अनुदानातून भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. आलं हे उत्पन्न मिळवून देणारे पीक आहे. बऱ्याच वर्षानंतर गतवर्षी आलं पिकाने शेतकऱ्यांना बरीच रक्कम मिळवून दिली. अर्थात याला खर्च देखील बराच येतो. त्यामुळे शेतकरी वर्ग हे पीक घेण्याच्या नादाला लागत नाहीत.

परंतु गेल्या वर्षी या पिकापासून मिळणारे उत्पन्न हे आश्‍चर्य करणारे होते. नेमका याचाच विचार करून चालू वर्षी शेतकऱ्यांबरोबरच बागायतदार वर्गाने या पिकाची लागण केली. अक्षय तृतीया झाल्यानंतर या पिकाची लागण केली जाते. ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची उपलब्धता जास्त होती. त्यांनी उन्हाळ्यात या पिकाची लागण केली. ज्यांच्याकडे पाण्याची कमतरता आहे, त्यांनी साधारण जून महिन्यात या पिकाची लागण केली. परंतु या दोन्ही वेळेस निसर्गाने प्रकोप केला. चालू वर्षी उन्हाळा अति तीव्र पडला.

त्यामुळे कितीही पाणी दिले तरी या पिकास कमीच पडत होते. याचा उगवणीवर परिणाम झाला. चालू वर्षी सुरुवातीस पावसाने ओढ दिली. त्यानंतर पाऊस इतका पडला की आलेले पीक अति पावसामुळे वाया गेले. यामुळे मोठे नुकसान झाले. एकीकडे अति उन्हाळा आणि दुसरीकडे अतिपाऊस याचा मेळ झाला आणि हे पीक धोक्‍यात आले. या सर्व कारणांमुळे या वर्षी आल्याचे उत्पादन घटण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.