सांगवी – पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या जोरदार पावसामुळे नवी सांगवी परिसरात मोकळ्या जागेत पाण्याची डबकी साठून राहिल्यामुळे डासांची मोठ्या प्रमाणात पैदास झाली आहे. परिणामी या परिसरात साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. यामध्ये काही रुग्णांना डेंग्यूची लागण झाल्याचेही तपासणीत आढळून आले आहे.
विशेषतः नवी सांगवीतील समतानगरमध्ये अनेक नागरिक तापाने फणफणले असून, खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. मुळात या परिसरात दरवर्षी पावसाळ्यात डेंग्यूचे रुग्ण आढळून येतात.
याबाबत सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत जोगदंड यांनी सांगितले की, समता नगरच्या पाठीमागे ढोरे फार्म हे खासगी मालकीचे असून, त्याठिकाणी औषध फवारणी होणे आवश्यक आहे. डासाचे प्रमाण वाढल्याने नागरिक हैराण झाले आहेत. आरोग्य विभागाने परिसरात ज्या ज्या ठिकाणी पाणी साठून राहिले आहे, त्याचा निचरा होण्याची सोय करण्यात यावी.
साथीच्या मलेरिया, डेंग्यू पसरण्यापूर्वी प्रशासनाने योग्य त्या उपाययोजना कराव्यात. आरोग्य निरीक्षक उध्दव डवरी यांनी म्हणाले की, परिसरात औषध फवारणी केली आहे. परिसर लवकरच स्वच्छ केला जाणार आहे. नागरिकांनीही आपला परिसर स्वच्छ ठेवावा.