भाज्यांच्या दरात मोठी घसरण, गगनाला भिडलेले दर झाले कमी, मटार, शेवगा महागला
पिंपरी – गेल्या महिनाभरापासून पावसाने धुमाकूळ घातल्यामुळे घटलेली भाजीपाल्याचे दर चांगलेच वाढले होते.फळभाज्यांबरोबरच पालेभाज्याही महागलेल्या असल्यामुळे भाजीपाला खरेदी करणे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले होते. मात्र, महिनाभरानंतर आता भाजीपाल्याचे दर कमी झाले आहेत.
मागच्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात भाज्यांच्या दरामध्ये मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे भाजीपाला खरेदी करणे आता सर्वसामान्यांच्या आवाक्यात आले आहे. अन्य भाज्यांचे दर घटले असले तरी शेवगा आणि मटारीचे दर मात्र वाढले आहेत.
पिंपरी येथील लालबहाद्दूर शास्त्री भाजी मंडई व मोशी येथील उपबाजार समितीमध्ये जुलै महिन्याच्या शेवटी भाजीपाल्याची आवक घटली होती. तर ऑगस्ट महिन्यातही सुरवातीचे दोन आठवडे पावसामुळे भाजीपाल्याची कमी आवक झाली होती. त्यामुळे, भाज्यांचे दर गगनाला भिडले होते. पालेभाज्यांबरोबरच फळभाज्याही चांगल्याच महाग झाल्याने भाजी खरेदी करणे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले होते. मागच्या दोन आठवड्यापासून पाऊस संपल्यानंतर भाज्यांची आवक वाढली होती. मात्र आवक वाढल्यानंतरही भाजीपाल्याचे दर मात्र चढेच राहिले होते.
या आठवड्यात मात्र मोशी येथील उपबाजार समितीमध्ये भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली. त्यामुळे फळभाज्या आणि पालेभाज्यांच्या दरामध्ये मोठी घसरण होवून भाज्यांचे दर सर्वसामान्यांच्या आवक्यात आल्याचे दिसून आले. या आठवड्यात श्रावणी घेवडा, राजमा याबरोबरच भेंडी, मिरची, दोडका, वांगी, टोमॅटो, बटाटा, दुधी भोपळा, काकडी, कोबी यांचे दरामध्ये मागच्या आठवड्याच्या तुलनेत चांगलीच घसरण झाली आहे. तर मटार आणि शेवग्याच्या दरामध्ये वाढ झाली आहे. फळ भाज्यांच्या तुलनेत पालेभाज्यांची आवक सरासरी एवढी कायम आहे. त्यामुळे, सध्या तरी पालेभाज्यांचे दर स्थिर आहेत.
मोशी येथील उपबाजार समितीमधील फळभाज्यांचे घाऊक विक्रीचे दर
(क्विंटलमध्ये) बटाटे : 750, कांदे : 1700, टोमॅटो : 1150, गवार : 4250, दोडका : 2750, लसूण : 6500, आले : 7000, भेंडी : 2500, वांगी : 3250, कोबी : 1250, फ्लॉवर : 1500, शेवगा : 4250, हिरवी मिरची : 2750, शिमला मिरची : 1750, दुधी भोपळा : 1250, काकडी : 1150, चवळी : 2500, गाजर : 2250, वालसर : 3500, मटार : 4500, कारली : 2000, लिंबू : 300 (शेकडा).
पालेभाज्यांचे दर पुढीलप्रमाणे (जुडी)
कोथिंबीर : 9, मेंथी : 9, शेपू : 5, पालक : 5, मुळा : 7, तांदुळजा : 15, पुदिना : 3. फळांचे भाव पुढीलप्रमाणे (किलो) : सफरचंद : 140, पेरू : 60 ते 80, पपई : 40, डाळींब : 70 ते 90, मोसंबी : 80 ते 100, संत्री : 120, किवी : 100 (5 नग), ड्रॅगन फ्रूट : 80 (1 नग), पिअर : 160.