पुणे – करोनामुळे रुतलेली वाहन विक्रीचे चाके सुमारे आठ महिन्यांनंतर वेगाने फिरण्यास सुरुवात झाली आहे. दिवाळी पाडव्याला पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात 14 हजारांहून अधिक वाहनांची नोंदणी झाली. मागील वर्षीच्या तुलनेत वाहन संख्येत घट झाली असली तरी, चारचाकी वाहनांची नोंदणी जवळपास दुप्पट झाली आहे.
यंदा वाहन विक्रीवरदेखील करोनाचा परिणाम झाला होता. साडेतीन मुहूर्तांचे औचित्य साधून वाहन खरेदी करण्याला नागरिक प्राधान्य देतात. मात्र यंदा गुढीपाडवा आणि अक्षय्यतृतीया या दोन्ही मुहूर्तांवर वाहन खरेदी झाली नाही. तर दसऱ्याच्या निमित्ताने वाहन उद्योग “रिस्टार्ट’ झाला.
करोनाच्या अनुषंगाने सध्या नागरिक खासगी वाहनांकडे वळत असून, चारचाकीला सर्वाधिक प्राधान्य देत आहेत. शुभ मुहूर्ताचे औचित्य साधून वाहन घरी आणण्यासाठी सुमारे 1 आठवडा आधीपासून वाहन नोंदणी प्रक्रिया सुरू होते.
पूर्वी सायकलींचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरात वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा वाहन विक्रीत काही अंशी घट झाली आहे. मात्र महसुलात वाढ झाली. दुचाकीच्या संख्येत अंशत:, तर रिक्षा, टॅक्सी या वाहनांत निम्याने घट झाली आहे.