पुणे : यंदाच्या वर्षातील शेवटचा टी20 सामना 24 डिसेंबर रोजी अमेरिका आणि आयर्लंड यांच्यात झाला, ज्यामध्ये आयरिश संघाने नऊ धावांनी विजय मिळवला. झाला. 2021 हे वर्ष निःसंशयपणे टी20 क्रिकेटचे होते. टी20 विश्वचषकामुळे, सर्व संघांनी यावर अधिक लक्ष केंद्रित केले होते.
2021 मध्ये पाकिस्तानने सर्वाधिक 29 टी20 सामने खेळत सर्वाधिक 20 विजय मिळवले. तर भारताने 16 टी-20 सामने खेळत 10 विजय मिळवले तर सहा सामन्यांत पराभव पत्करावा लागला.
या पार्श्वभूमिवर 2021 मध्ये टी20 क्रिकेट गाजवणार्या 5 फलंदाजांच्या कामगिरीचा आढावा.
1. मोहम्मद रिझवान, पाकिस्तान (1,326 धावा)
मोहम्मद रिझवानने यंदा टी20 क्रिकेटमध्ये जगातिल सर्वच गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले. या यष्टीरक्षक फलंदाजाने 134.89 च्या स्ट्राइक रेटने 26 समान्यांत 1,326 धावा करत टी20 क्रिकेटमझध्ये एका वर्षात सर्वाधिक धावा करण्याचा विश्वविक्रम आपल्या नावे केला. यामध्ये रिझवानने 73.66 च्या सरासरीने फलंदाजी करताना एक शतक आणि 12 अर्धशतके झळकावली.
2 बाबर आझम, पाकिस्तान (939 धावा)
टी20 विश्वचषक 2021 मध्ये सर्वाधिक धावा करणार्या फलंदाजांमध्ये अव्वल स्थानी राहिलेल्या पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम यावर्षी टी20 क्रिकेटमध्ये 26 सामन्यांत 939 धावा करत सर्वाधिक धावा करणार्या फलंदाजांमध्ये त्याचा सलमी जोडीदार मोहम्मद रिझवाननंतर दुसर्या क्रमांकार्या सर्वाधिक धावा केल्या. यामध्ये बाबरने 1 शतक आणि नऊ अर्धशतके झळकावली त्याचा स्ट्राइक रेट 127.58 तर सरासरी 37.56 इतकी होती.
3 मार्टीन गुप्टिल, न्यूझीलंड (678 धावा)
नुकत्याच पार पडलेल्या टी20 विश्वचषकात न्यूझीलंडला अंतिम फेरीत स्थान मिळवून देण्यात मार्टीन गुप्टिलचा सिंहाचा वाटा होता. मार्टीन गुप्टिलने यावर्षी 18 सामन्यांमध्ये 37.66 च्या सरासरीने आणि 145 पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने एकूण 678 धावा करत सर्वाधिक धावा करणार्या फलंदाजांमध्ये तिसरे स्थान पटकावले. गुप्टिलने या वर्षी पाच अर्धशतके नोंदवण्या व्यतिरिक्त 53 चौकार आणि 41 षटकार ठोकले.
4 मिचेल मार्श, ऑस्ट्रेलिया (627 धावा)
ऑस्ट्रेलियाला पहिले टी20 विश्वचषक विजेतेपद मिळवून देण्यात अष्टपैलू मिचेल मार्शची महत्वाची भूमिका होती. सातत्याने दुखापतीचा सामना करणारा मार्श यंदा मात्र सुसाट फॉर्ममध्ये होता. त्याने 2021 मध्ये खेळलेल्या 20 सामन्यांमध्ये सहा अर्धशतकांसह 627 धावा करत सर्वाधिक धावा करणार्या फलंदाजांमध्ये चौथे स्थान पटकावले.
5. जोस बटलर, इंग्लंड (589 धावा)
जोस बटलर टी20 क्रिकेटमध्ये इंग्लंडचा सर्वात यशस्वी फलंदाज होता. सलामीवीर बटलरने 14 सामन्यांमध्ये 143.30 च्या स्ट्राइक रेटने 589 धावा केल्या. फलंदाजीची 65.44 अशी दमदार सरासरी असलेल्या बटलरने टी20 विश्वचषक स्पर्धेत श्रीलंकेविरुद्ध नाबाद 101 धावांची खेळी करत टी20 कारकिर्दीतील सर्वोच्च धावसंख्या नोंदवली. यंदा सर्वाधिक धावा करणार्या फलंदाजांमध्ये तो 5व्या स्थानी राहिला.